पनवेल : रायगड जिल्ह्यातील मतदारांना दिलासा देणारी ही आनंदाची बातमी आहे. बुधवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी रायगड जिल्ह्यातील मतदानात 3.29 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ सुखावह असली तरी मतदान 100 टक्के केव्हा होणार, हा सवाल आहेच.
विधानसभेसाठी बुधवारी राज्यात एका टप्प्यात मतदान झाले. रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघ आहेत. या सातही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 2019 मध्ये रायगडमधून विधानसभेसाठी 65.86 टक्के मतदान झाले होते. तर २० नोव्हेंबर रोजी रायगडमध्ये तब्बल 69.15 टक्के मतदान झाले आहे. त्यातही सर्वाधिक मतदान अलिबाग-मुरुड मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात 77.15 टक्के मतदान झाले आहे. तर पनवेलमध्ये जिल्ह्यात सर्वात कमी (58.63 टक्के) मतदान झाले आहे.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : मतदारांनी फिरवली पाठ तरी मतदानात वाढ; मुंबईकरांनी केली निराशा
जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो, याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, रायगडमध्ये 100 टक्के मतदान केव्हा होईल, सर्व मतदार केव्हा जागरूक होतील, असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले आहे, याची दखल घ्यावी लागेल.
रायगडमधून विधानसभेसाठी मतदान (टक्के)
मतदारसंघ २०२४ २०१९
पनवेल ५८.६३ ५४.१३
कर्जत ७५.३० ७०.८१
उरण ७६.८० ७४.३२
पेण ७३.०२ ७१.२८
अलिबाग ७७.१५ ७२.६१
श्रीवर्धन ६१.३७ ६०.८४
महाड ७१.५३ ६६.९८
(Edited by Avinash Chandane)