Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Assembly Result : महेंद्र थोरवे यांची ती खेळी यशस्वी, कर्जतमध्ये कोण...

Maharashtra Assembly Result : महेंद्र थोरवे यांची ती खेळी यशस्वी, कर्जतमध्ये कोण ठरले किंगमेकर, खोपोलीत रिक्षा रोखण्याची कामगिरी कुणाची

Subscribe
दीपक पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा

कर्जत : विधानसभेच्या कर्जत-खालापूर मतदासंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांचा शनिवारी (23 नोव्हेंबर) निसटता विजय झाला. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच हाय व्होल्टेज राजकारण सुरु होते. मतमोजणीत अपक्ष सुधाकर घारे आणि महायुतीचे महेंद्र थोरवे यांच्यात 19 व्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत सुरू होती. मात्र खालापूर खोपोली येथील बूथ सुरू झाले आणि थोरवे यांनी मुसंडी मारली. मुळात सुधाकर घारे यांना कर्जतमध्ये रोखणे शक्य होणार नाही हे पाहून थोरवे यांनी थेट खालापूर खोपोली येथे जोरदार फिल्डिंग लावली होती. थोरवे यांची हीच खेळी यशस्वी झाली आणि खोपोलीमध्ये रिक्षाला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

कर्जत हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील मतदारसंघ असल्याचे दिसले. एकूण 9 पैकी 3 मुख्य उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, महाविकास आघाडीचे नितीन सावंत आणि अपक्ष सुधाकर घारे अशी लढत होती. प्रचाराच्या मध्यावरच ठाकरे गटाचे काही बडे नेते शिवसेनेत आले आणि नितीन सावंत यांची ताकद कमी झाली. तर सुधाकर घारे यांना रोज पाठिंबा वाढत होता. महेंद्र थोरवे यांनी बेरजेच्या राजकारणाचा फायदा घेतला. ऐन प्रचारामध्ये त्यांनी अनेक बडे राजकीय नेत्यांची पक्षात शिवसेनेची मोट बांधली. मुळात 2019 च्या निवडणुकीत थोरवे यांनी पक्ष एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न केले होते. तो अनुभव शिवसेनेतील फुटीनंतर थोरवे यांच्या कामी आला.

- Advertisement -

हेही वाचा…  Politics : गुवाहाटीला आलेला आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल; एकनाथ शिंदे निवृत्ती घेणार?

या मतदारसंघात कर्जत आणि खालापूर हे दोन तालुके येतात. कर्जतमध्ये ग्रामीण भागात घारे यांची रिक्षा सुसाट होती. ही रिक्षा खोपोलीत रोखण्यासाठी सुनील पाटील, हनुमंत पिंगळे, तालुकाप्रमुख संदेश पाटील, महिलाप्रमुख सुप्रिया साळुंके, भाई शिंदे यासह युवा टीम कामी आली. यासह भाजपचे नरेश पाटील, आरपीआयचे नरेंद्र गायकवाड तसेच सर्व भाजपचे कार्यकर्ते सज्ज होते. कर्जत तालुक्यात नेरळ, कर्जत या शहरी भागात थोरवे यांनी घारे यांना मागे टाकले तरी ग्रामीण भागात घारे यांनी मारलेली मुसंडी थोरवेंना अडचणीची ठरली होती. त्यामुळे थोरवे यांनी खालापूर, खोपोलीमध्ये रिक्षा रोखण्यासाठी अधिक ताकद लावली आणि हीच खेळी यशस्वी ठरली. साधारण 20 व्या फेरीपासून थोरवे यांनी निकालात आघाडी घेतली तीच त्यांना विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली. या अटीतटीच्या लढाईत धनुष्यबाणाने विजयाचे लक्ष्य भेदले आणि थोरवे पुन्हा विजयी झाले.

- Advertisement -

सुरेश लाड किंगमेकर

२०१९च्या निवडणुकीनंतर माजी आमदार सुरेश लाड आणि महेंद्र थोरवे यांच्यातून विस्तवदेखील जात नव्हता. कर्जतमधील प्रशासकीय भवनाच्या भूमिपूजनावरून वाद होत मविआमध्ये वादाची ठिणगी पडली होती. मात्र राजकारणात ट्विस्ट आला. सुरेश लाड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते. त्यानंतर अचानक डिसेंबर 2023 मध्ये सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. प्रकृती वगैरे अडचणींनी ते राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी या विधानसभा निवडणुकीत त्यांनी करिष्मा दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी लाड आणि थोरवे यांचे इतके जुळले की, अर्ज भरताना थोरवे यांनी प्रथम लाड यांचा आशीर्वाद घेतला. तर लाड यांनीही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उतरवले. खोपोली भागात लाड यांच्या कट्टर समर्थकांनी थोरवेंसाठी बुथवर धनुष्यबाणसाठी खिंड लढवत रिक्षाला थोपवले. इथेच सुरेश लाड थोरवेंसाठी किंगमेकर ठरले.

नितीन सावंत यांचा दारुण पराभव

ठाकरे गटाचे नितीन सावंत यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कर्जत तसेच खोपोलीत सभा घेतल्या. या सभांचा परिणाम होईल असे चित्र होते. प्रत्यक्षात निवडणूक मध्यावर आलेली असताना ठाकरे गटाच्या काही नेते शिवसेनेत गेले. तरीही सावंत यांनी हिमतीने निवडणूक लढवली. त्यासाठी पत्नी आणि मुलगीदेखील मैदानात उतरली होती. तरीही निकालामध्ये सावंत पहिल्या फेरीपासून तिसऱ्या क्रमांकावरच राहिले.

ग्रामीण भागात रिक्षा सुसाट

कर्जतमध्ये लाडकी बहीण फॅक्टर चालला नाही. कारण कर्जत विधानसभा मतदासंघाच्या ग्रामीण भागातून सर्वाधिक मतदान सुधाकर घारेंच्या पदरात पडले. घारेंनी कोरोनाकाळात ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी, पाड्यात, घरात धान्याच्या किट पोहचवून कुटुंबांना हातभार लावला होता. तर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे टँकर ग्रामीण भागात दिले होते. त्याची परतफेड मतदानातून करण्यात आली.

नावसाधर्म्याची खेळी फसली

विरोधक उमेदवाराची मते विभाजन करण्यासाठी नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे केले जातात. कर्जतमध्ये सुधाकर परशुराम घारे यांच्या नावासारखे दोन उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र, घारे यांनी प्रचार यंत्रणा इतकी प्रभावी राबवली की, मतदारांनी फोटो निशाणी पाहूनच मतदान केले. याचा परिणाम एकूण तीन सुधाकर घारे असताना इतर दोन सुधाकर घारे यांना एकूण 3 हजार 76 मतांपेक्षा जास्त उडी घेता आली नाही. त्यामुळे ही खेळी फेल झाल्याचे दिसले.

मतदारांचा विकासाला कौल?

महेंद्र थोरवे यांनी 2019 मध्ये आमदार झाल्यापासून मतदारसंघात 2 हजार 900 कोटींचा निधी आणल्याचा दावा केला होता. कोरोनानंतरच्या अडीच वर्षांत त्यांनी अनेक विकासकामे केली. याच कामांच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे गेले होते.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -