अलिबाग : निवडणूक आयोगाने मतदारांना ‘नोटा’चा पर्याय दिला आहे. म्हणजे निवडणूक लढवणाऱ्यांपैकी एकही उमेदवार निवडून देण्यास योग्य वाटत नसेल तर मतदार ‘नोटा’ हे बटण दाबून उमेदवारांबाबत नकारात्मक मत नोंदवू शकतो. या विधानसभा निवडणुकीत रायगडच्या सात मतदारसंघांमधील 17 हजार मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. त्यातही सर्वाधिक ‘नोटा’चा वापर पनवेल आणि श्रीवर्धन मतदारसंघात झाला आहे.
‘नोटा’चा पर्याय येण्यापूर्वी कलम 49 (ज) होते. कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स 1961 नुसार (निवडणूक अधिनियम 1961) मतदार 17 नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये मतदार यादीतला क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंत नाही, असे सांगत असे. निवडणूक अधिकारी त्यावर शेरा लिहून मतदारांची सही त्या ठिकाणी घेत असत. मात्र, अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख गुप्त राहत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला आक्षेप घेतला होता. मात्र, ईव्हीएमवरील ‘नोटा’ बटणामुळे मतदाराची ओळख गुप्त राहते. 2013 पासून ‘नोटा’चा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेव्हापासून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पर्याय मतदारांकडून प्रभावीपणे वापरला गेला आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघात 2 हजार 313 मतदारांनी ‘नोटा’ला मत दिले होते. पेणमध्ये 2 हजार 473, कर्जतमध्ये 3 हजार 72 पनवेलमध्ये 12 हजार 399, उरणमध्ये 3 हजार 77, श्रीवर्धनमध्ये 3 हजार 772 आणि महाडमध्ये 2 हजार 82 असे एकूण 29 हजार 188 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. तर यंदा मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात 4 हजार 855, पेणमध्ये 6 हजार, श्रीवर्धनमध्ये 3 हजार 322 आणि महाडमधील 3 हजार 613 मतदारांनी ‘नोटा’च्या माध्यमातून नकारात्मक मतदानचा पर्याय निवडला होता.
या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय निवडण्याकडे मतदानाचा कल कमी असल्याचे दिसले. अलिबाग मतदारसंघातून १ हजार ६५८, पेणमध्ये २ हजार ४७३, कर्जतमध्ये १ हजार ३५६, पनवेलमध्ये ३ हजार ९०५, उरणमध्ये २ हजार ६५३, श्रीवर्धनमध्ये ३ हजार ३७५ आणि महाडमधून ८८९ अशा एकूण १६ हजार ९०९ मतदारांनी उभे असणाऱ्यांपैकी एकही उमेदवार योग्य नसल्याचे वाटल्याने ‘नोटा’चे बटण दाबून एकप्रकारे निषेध व्यक्त केला.
एक टक्का ‘नोटा’
रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी यापैकी 17 लाख 21 हजार 38 मतदारांनी मतदान केले. रायगड जिल्ह्यात एकूण 69.15 टक्के मतदान झाले. यातील 16 हजार ९०९ मतदारांनी म्हणजेच जवळजवळ एक टक्का मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
(Edtied by Avinash Chandane)