Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Assembly Result : अलिबागमध्ये शेकापचा सलग दुसरा पराभव, काय आहेत शेकापच्या...

Maharashtra Assembly Result : अलिबागमध्ये शेकापचा सलग दुसरा पराभव, काय आहेत शेकापच्या पराभवाची कारणे

Subscribe
रत्नाकर पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचा हक्काचा विजयगड असलेल्या रायगडमध्ये पक्षाला पुन्हा जोरदार धक्का बसला आहे. शेकापने रायगडमध्ये अलिबाग, पेण, पनवेल आणि उरणमध्ये मिळून चार उमेदवार दिले होते. या चारही उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यातही खुद्द अलिबागमधील पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. 2019 आणि 2024 असे सलग दोन वेळा अलिबाग मतदारसंघात पराभव झाल्यामुळे शेकापमध्ये आता अनेक बाबींचा उहापोह सुरू झाला आहे.

महाविकास आघाडीत असूनही आघाडीचा धर्म न पाळल्याने पनवेलमध्ये मोठ्या पराभवाला शेकापला सामोरे जावे लागले. तेथे जर शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी झाली असती तर काही प्रमाणात भाजपला शह देण्यात यश मिळाले असते. कर्जतमध्ये शेकापने अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना दिलेला उघड पाठिंबाही तितकाच कारणीभूत ठरला. प्रचारसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयंतराव, उलटा-सुलटा खेळ करू नका, असा इशारा वजा संदेश दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम अलिबागमधील मतदानावर झाल्याचे दिसते. काँग्रेसची मते आपल्यालाच पडतील, असा छातीठोक दावा शेकाप नेते जयंत पाटील यांनी केला होता. प्रत्यक्षात काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाल्याचे दिसून येते.

- Advertisement -

हेही वाचा…  Maharashtra Election 2024 : सर्वात मोठ्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; EVM बद्दल म्हणाले…

कुटुंबकलहाचा फटका

कुटुंबातील कलहाने शेकापला मोठा फटका बसल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, भावना पाटील, सवाई पाटील ही घरातील हक्काची नेते मंडळीच निवडणूक प्रचारापासून अलिप्तच राहिली होती. त्याचाही मोठा परिणाम शेकापला मिळणाऱ्या मतदानावर झाला. ही मंडळी सक्रिय झाली असती तर कार्यकर्ते आणखी जोमाने निवडणुकीत उतरले असते. पण कुटुंबकलह मिटवण्यात शेकाप नेतृत्वाला यश आलेच नाही, त्याची परिणीती अखेर पराभवात झाली.

- Advertisement -

थेट विधानसभेची संधी भोवली?

उमेदवार निवडतानाही शेकाप नेतृत्वाने चित्रलेखा पाटील यांच्याऐवजी सुप्रिया पाटील यांना दिली असती तर कदाचित निकालात मोठा फरक पडला असता. शिवाय कुटुंबात एकोपा राहिला असता. चित्रलेखा पाटील यांना पुढील निवडणुकीचे टार्गेट ठेवून प्रचाराची धुरा सोपवली गेली असती तर त्यांनाही काम करण्याची संधी मिळाली असती. कोणतीही निवडणूक न लढवणाऱ्या चित्रलेखा पाटील यांनी आधी पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा पायऱ्या चढतच विधानसभेची निवडणूक लढवणे अपेक्षित होते. शेकापमध्ये दत्ता पाटील वगळता मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील यांनी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमधून विधानसभेत पाऊल टाकले होते. ते पक्षातील आणि ज्येष्ठांना रुचले नसल्याचे निकालावरून दिसून आले.

पराभवाला जबाबदार कोण?

2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा एकही आमदार रायगडमधून विजयी झालेला नाही. पक्ष नेतृत्वासाठी ही चिंतेची बाब आहे. कुटुंबातील कलह, महाविकास आघाडीमधील बेबनाव आणि उमेदवार निवडीत झालेली चूक आदी कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत शेकापला पराभवाला सामोरे जावे लागले.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -