श्रीवर्धन : विधानसभेमध्ये आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी तब्बल 82 हजार 854 मतांची दणदणीत आघाडी घेत मोठा विजय मिळवला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे यांना एक लाख 15 हजार 226 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल नवगणे यांना 33 हजार 33 मते मिळाली. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत अदिती तटकरे यांना 92 हजारांहून अधिक मते मिळाली होती आणि तेव्हा 39 हजार 800 मतांच्या आघाडीने त्या विजयी झाल्या होत्या.
अदिती तटकरे विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांची आणि अनिकेत तटकरे यांनी मिरवणूक काढली तसेच विजयाचा जल्लोष केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. काँग्रेसचे राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. मात्र, राजेंद्र ठाकूर यांना अवघी 4 हजार 70 मते मिळाली तर मनसेचे फैसल पोपेरे यांना 2 हजार 108 मते मिळाली आहेत.
हेही वाचा… Maharashtra Election Result : अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी पुन्हा विजयी
या निवडणुकीचा कल पाहिला तर श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये जातीयवादाचा नमुना संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाचे मतदान सर्वाधिक असल्यामुळे शरद पवार यांनी अनिल नवगणे यांना उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात कुणबी मतदारांनीही नवगणे यांना फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये महायुतीच्या शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट) आदी कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे यांच्यासाठी भरभरून काम केल्यानेच हा विजय मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे मोठे मताधिक्य घेऊन श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये कुणीही विजयी झाला नव्हता.
हेही वाचा… Balasaheb Thorat : काँग्रेसचा CMपदाचा चेहरा पडला, थोरातांचा पराभव करत अमोल खटाळ ठरले जायंट किलर
विशेष म्हणजे राज्यात सुरू असलेली आणि सर्वाधिक लोकप्रिय लाडकी बहीण योजना अदिती तटकरे यांच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून राबवण्यात येत आहे. याचा त्यांना सर्वाधिक मोठा फायदा झाला आहे. शिवाय त्यांचा मतदारांशी असलेला संपर्क, वडील आणि खासदार सुनील तटकरे यांचा जनसंपर्क तसेच अनिकेत तटकरे यांचे काम या सर्वांचा एकत्रित परिणाम त्यांच्या विजयाच्या यशात दिसून आला आहे.
(Edited by Avinash Chandane)