कर्जत : विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत मतदारसंघाच्या मतमोजणीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अटीतटीच्या चुरशीनंतर शिवसेनेचे महेंद्र थोरवे विजयी झाले. त्यांना अपक्ष उमेदवार सुधाकार परशुराम घारे यांची तोडीस तोड टक्कर दिली. मात्र, 5 हजार 761 मतांनी घारे पराभूत झाले. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीत सावंत तिसऱ्या स्थानावर राहिले.
कर्जत-खालापूरच्या मतदारंनी पुन्हा महायुतीचे महेंद्र थोरवे यांना कौल दिला. यावेळी मतमोजणीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली. अपक्ष असूनही सुधाकर घारे यांनी अनेक फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. काहीवेळी एकूण मतदानात आघाडी घेतली होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे समर्थक आणि मतदार यांच्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. महायुतीचे महेंद्र थोरवे विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे गेले. तर विकासाचे व्हिजन घेऊन महाविकास आघाडीचे नितीन सावंत निवडणुकीच्या रिंगणात होते.
हेही वाचा… CM Eknath Shinde : आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, शिंदेंचा टोला
26 फेऱ्यांपर्यंत मतमोजणी उमेदवारांची धाकधूक वाढवणारी ठरली. सुरुवातीपासून थोरवे आणि घारे यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. तेव्हापासून तिसऱ्या स्थानावर राहिलेले ठाकरे गटाचे नितीन सावंत त्याच स्थानावर राहिले. कधी घारे यांनी घेतलेली आघाडी थोरवे मोडीत काढत होते तर कधी थोरवे यांची आघाडी घारे उधळवून लावत होते. अखेरीस खालापूर तालुक्यातील बुथवरील मतमोजणीला सुरुवात झाली आणि अखेरच्या ८ फेऱ्यांमध्ये थोरवे यांनी घेतलेली आघाडी अबाधित राहिली आणि 5 हजार 761 मतांनी विजय मिळवला.
महेंद्र थोरवे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. तर थोरवे यांनीही शड्डू ठोकून हम किसीसें कम नही असल्याचे दाखवून दिले. कर्जत प्रशासकीय भवनात 14 टेबलांवर 26 फेऱ्यांत ही मतमोजणी झाली.
कुणाला किती मते ?
महेंद्र थोरवे (शिवसेना) – 94 हजार 511
सुधाकर घारे (अपक्ष) – 88 हजार 750
नितीन सावंत (शिवसेना उबाठा) – 48 हजार 736
(Edited by Avinash Chandane)