पेण : भाजपचे रवींद्र पाटील यांनी सलग दुसऱ्यांना पेण मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोलताशाच्या ठेक्यावर ताल धरत जल्लोष केला. या विजयामुळे पेण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह जबरदस्त वाढला आहे.
भाजप महायुतीचे रवींद्र पाटील यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने अतुल म्हात्रे आणि महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रसाद भोईर यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे दोन्ही मविआमध्ये असूनही दोघांनी उमेदवार दिल्याने भाजपच्या रवींद्र पाटील यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यात वाटाघाटी होऊन मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. अखेर अपेक्षप्रमाणे भाजपचा विजय झाला असून कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत.
रवींद्र पाटील यांना 1 लाख 24 हजार 631 मते मिळाली. त्यांनी 60 हजार 810 मतांनी ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांच्यावर मात केली आहे. प्रसाद भोईर यांना 63 हजार 821 मते तर शेकापचे अतुल म्हात्रे यांना 29 हजार 191 मते मिळाली. शिवाय अभिनव भारत पक्षाचे मंगल पाटील यांना 2 हजार 266 आणि वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र कोळी यांना 1 हजार 701 मते मिळाली. तर ‘नोटा’च्या पारड्यात 2 हजार 473 मते पडली आहेत.
मतमोजणी पूर्ण होताच महायुतीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात पेण शहरातून मिरवणूक काढली. यात खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, वैकुंठ पाटील, ललित पाटील, मंगेश दळवी, कौशल्याताई पाटील, नीलिमा पाटील, प्रीतम पाटील, डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे आदी सहभागी झाले होते.
(Edited by Avinash Chandane)