Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Election Result : अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी पुन्हा विजयी

Maharashtra Election Result : अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी पुन्हा विजयी

Subscribe
अलिबाग / मुरुड : विधानसभेच्या निवडणुकीत अलिबाग मतदारसंघातून महायुती शिवसेनेचे महेंद्र दळवी पुन्हा विजयी झाले आहेत. महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमसेठ यांना मिळाली आहेत. महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर मुरुडमध्ये कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत आणि फटाके फोडत जल्लोष केला. तसेच एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.
निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. संपूर्ण मतदारसंघ दोघांनी पिंजून काढला होता. मात्र, भाजपचे उपाध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमसेठ यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे महेंद्र दळवी यांची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर भाजपने भोईर यांची पक्षातून हकालपट्टी करत दळवी हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतून चित्रलेखा पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा जाहीर करून उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली होती. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या झाल्या. महेंद्र दळवी यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत टिकवून धरली. 2019 मध्ये महेंद्र दळवी पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी त्यांनी शेकापचे सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील यांचा पराभव केला होता.
मुरुडमध्ये महेंद्र दळवी यांच्या विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. यात श्रीकांत सुर्वे, गिरीश साळी, सागर चौलकर, समीर दवनाक, सुशील ठाकूर, महेश मानकर, विजय पाटील आदींसह शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी श्रीकांत सुर्वे म्हणाले की, महेंद्र दळवी यांनी या मतदारसंघात केलेला विकास लोकांना हा भावल्याने मतदात्यांनी महेंद्र दळवी यांचा 29 हजार 565 मतांनी भरघोस विजय केला आहे. आता यापुढे अधिक जोराने अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघात विकास होईल आणि त्याबरोबर तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न होईल, असे सुर्वे म्हणाले.

कुणाला किती मते

महेंद्र दळवी (शिवसेना) – 1 लाख 13 हजार 599

चित्रलेखा पाटील (शेकाप) – 84 हजार 34

- Advertisement -

दिलीप भोईर (अपक्ष) – 33 हजार 210

(Edited by Avinash Chandane)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -