घररायगडमाणगाव पोलीस वसाहतीची मरणासन्न अवस्था, पोलिसांना राहण्यासाठी निवासस्थाने नाहीत

माणगाव पोलीस वसाहतीची मरणासन्न अवस्था, पोलिसांना राहण्यासाठी निवासस्थाने नाहीत

Subscribe

माणगावमध्ये महसूल वसाहत, तहसिलदार, प्रांत यांची अद्ययावत निवासस्थाने झाली आहेत. मात्र,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भाड्याच्या खोल्यांतून राहत आहेत. पोलीस वसाहतीचा मुख्यालयाच्या धर्तीवर जिर्णोध्दार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

माणगाव हा दक्षिण रायगड आणि जिल्ह्याचा अत्यंत महत्वाचा वेगाने विकसीत होत असलेला मोठा तालुका. या ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरिक्षकांना तसेच पोलिसांना राहण्या साठी साधी निवासस्थाने नसल्याचे वास्तव समोर आले आहे. माणगावची ब्रिटीशकालीन पोलीस वसाहत मरणासन्न अवस्थेत आहे. या पोलीस वसाहतीची दुर्दशा झाली असून ती पडीक झाली आहे. माणगावमध्ये महसूल वसाहत, तहसिलदार, प्रांत यांची अद्ययावत निवासस्थाने झाली आहेत. मात्र,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भाड्याच्या खोल्यांतून राहत आहेत. पोलीस वसाहतीचा मुख्यालयाच्या धर्तीवर जिर्णोध्दार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इंग्रजांच्या काळात कायदा सुव्यवस्थेतील महत्वाची भुमिका बजावणार्‍या पोलिसांना राहण्यासाठी पक्की दगडी पोलिस लाईन तसेच पोलिस निरिक्षकांसाठी बंगला होता. मात्र, आज पोलीस वसाहत पडीक आहे. येथे गवत माजले असून साप, किडे, मुंगी, विंचू यांचा वावर दिसून येतो. छप्पर सडले असून त्याला भोके पडली आहेत. संपूर्ण वसाहतच मोडकळीस आली आहे. वसाहतीच्या आवारात गंजलेल्या गाड्यांचे भंगार पाहावयास मिळते. या जिर्णावस्थेला नेमके कोण जबाबदार ? रायगडचे पोलीस अधिक्षक तसेच गृहमंत्री या गोष्टींकडे कधी पाहणार ? असा सवाल ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

आजवर आलेले अनेक पोलीस अधिकारी यांनी या वसाहतींच्या जिर्णोध्दारासाठी खूप पाठपुरावा केला.याबाबत अनेकदा वर्तमानपत्रात बातम्या आल्या. मात्र याची कोणीही दखल घेतली नाही. अक्षम्य दुर्लक्षाने माणगावचा पोलीस बंगला आता भुत बंगल्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे खेदजनक वास्तव जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजयअण्णा साबळे यांनी बोलून दाखविले. शहराच्या सौंदर्याला पडलेला हा काळा डाग वेळीच साफ केला पाहिजे, असे माणगावकर आता उपहासाने बोलत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -