निलेश पवार : आपलं महानगर वृत्तसेवा
महाड : भरत गोगावले यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारत विजयाचा चौकार मारल्याने महाड विधानसभा मतदारसंघात सुरवातीपासून चर्चेत असलेल्या बदलाच्या अपेक्षेला पूर्णविराम मिळालेला आहे. यापूर्वी शंकर बाबाजी सावंत आणि प्रभाकर मोरे हे तीन वेळा निवडून गेले होते. मात्र चौथ्यांदा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भरत गोगावले चौथ्यांदा आमदार होतील का, याची उत्सुकता मतदारसंघात होती.
महाड तालुका, पोलादपूर तालुका आणि माणागावमधील काही भाग यांचा महाड विधानसभा मतदारसंघ बनला आहे. भरत गोगावले हे सुरुवातीपासूनच जनमानसामध्ये एकरुप झालेले नेतृत्व आहे. समाजातील सर्व घटकांत त्यांची प्रतिमा अत्यंत जिवाभावाची आहे. मात्र त्यांच्याविरोधात दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल माणिक जगताप उतरल्याने मतदारसंघातील चित्र बदलून गेले होते. एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक बदलली गेली. त्यामुळे भरत गोगावले यांना कधी नव्हे एवढे अधिक प्रयत्न विजयासाठी करावे लागले. गोगावले यांच्या कार्यकाळात महाड विधानसभा क्षेत्रात फार मोठे प्रकल्प आले नसले तरी जनसामान्यांना आवश्यक असलेली छोटी मोठी कामे करण्यात त्यांना यश आले. यामुळे ग्रामीण भागातील त्यांचा दबदबा कायम राहिला. शहर औद्योगिक परिसर आणि सुशिक्षित मतदारांमध्ये मात्र आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा होती. मात्र, गोगावले यांच्याकडील कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि आर्थिक सक्षमता यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.
हेही वाचा…
भरत गोगावले यांना 1 लाख 17 हजार 442 मते मिळाली तर ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्या पारड्यात 91 हजार 232 मते पडली. या मतदारसंघांतून 2005 मध्ये माणिकराव जगताप आमदार झाले होते. त्यांनी महाडमध्ये अनेक प्रकल्प मंजूर करून आणले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत महाडकरांनी त्यांचा पराभव केला. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्ष होत्या. राजकीय क्षेत्रात त्यांचे ते पहिलेच पाऊल होते. मात्र, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. माणिकराव यांच्या निधनानंतर महाडमध्ये भरत गोगावले यांच्यासमोर त्याच ताकतीचा उमेदवार नव्हता. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील शिवसेनेमध्ये उघड दोन गट झाले. काँग्रेसमधील माणिकराव जगताप यांना मानणारा वर्ग ठाकरे गटांमध्ये सामील झाला आणि ठाकरेंसोबत कायम राहिलेला शिवसैनिक अशी एक मजबूत फळी तयार झाली. त्यामुळे गोगावलेंसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
माणगाव तालुक्यातील भागातून बाबुशेठ खानविलकर यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना चांगले मताधिक्य देण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात सुरुवातीपासूनच या विभागातून गोगावले यांनी आघाडी घेत गड कायम राखला. खानविलकर यांच्या शब्दामुळे जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भागामध्ये म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. याचा परिणाम मात्र उलटा झाला.
अनंत गीतेंची पाठ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांचा या मतदारसंघामध्ये चांगलाच प्रभाव आहे. केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले आणि राज्यात मंत्री राहिलेल्या अनंत गीते यांच्या पाठीशी महाड, माणगाव, पोलादपूरमधील कुणबी समाज कायम राहिलेला आहे. या तिन्ही तालुक्यांतील या समाजाचे मतदानाची टक्केवारी देखील मोठी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते पराभूत झाले होते. त्यानंतर अनंत गीते या मतदारसंघांमध्ये दिसून आले नाहीत. याबाबत ठाकरे गटाच्या महाडमधील प्रवक्त्यांनी देखील बोलणे टाळले होते.
कार्यकर्त्यांच्या सक्षम फळीचा अभाव
माणिकराव जगताप आमदार असताना त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची सक्षम फळी कार्यरत होती. मात्र, त्यानंतर बराच कालावधी गेला. शिवसेनेतील फुटीनंतर आणि काँग्रेसमधून ठाकरे गटात आलेल्या स्नेहल जगताप यांना कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी वेळ लागला. तसेच अगदी मोजकेच कार्यकर्ते आक्रमकपणे यामध्ये काम करताना दिसून येत होते.
जाती-धर्मावर आधारित राजकारण
या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपमधील काही नेत्यांनी जात धर्मावर काही वक्तव्ये करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे चित्र महाडमध्येही पाहायला मिळाले. भरत गोगावले हिंदुत्व विचारसरणीचे आहेत. त्यामुळे येथेही जातीधर्मावर आधारित राजकारण झाल्याचे मतपेट्यांतून बाहेर पडलेल्या आकडेवारीतून दिसून आले.
अर्थकारण-राजकारण एकत्रित
महाड विधानसभा मतदारसंघात पैशांचा पाऊस पडल्याची जोरदार चर्चा आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अनेक मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमधून महिलांना मिक्सर, ज्युसर वाटण्यात आले. ठिकठिकाणांहून मतदारांना वाहनांनी आणण्यात आले. यात महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कमी पडल्याचे जाणवले.
(Edited by Avinash Chandane)