माथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 20 ई-रिक्षा सुरू आहेत. या प्रायोगिक तत्त्वावरील आदेशाची मुदत डिसेंबर 2024 मध्ये संपली आहे. त्यामुळे उर्वरित 74 हातरिक्षांना त्वरित परवानगी मिळावी, या मागणीसाठी माथेरान श्रमिक रिक्षाचालक-मालक सेवा संस्था 14 जानेवारीपासून बेमुदत उपोषण करणार आहे. या संदर्भातील पत्र श्रमिक रिक्षाचालक संघटनेने माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दिले आहे.
सह नियंत्रण समितीच्या आदेशानुसार 10 जून 2024 पासून 20 परवानाधारक हातरिक्षा चालकांना स्वतःच्या रिक्षा सुरू करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. यात माथेरानमधील 94 पैकी सुरुवातीला फक्त 20 चालकांना परवानगी देण्यात आली होती. सर्व पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये या रिक्षा कशा चालतात हे पाहण्याकरता ही परवानगी देण्यात आली होती. त्याची मुदत 25 डिसेंबर रोजी संपली आहे. अशा प्रकारे चाचणी घेतल्यानतंरही अजून ई-रिक्षांना अजून परवानगी मिळालेली नाही.
ई-रिक्षाचे लाभार्थी
10 जून 2024 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत 1 लाख 9 हजार 377 पर्यटकांनी आणि स्थानिकांनी ई-रिक्षामधून प्रवास केला. रोज 274 विद्यार्थी 22 शिक्षक यांना ही सेवा पुरवली जाते. या काळामध्ये 188 रुग्णांना बीजे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सेवा दिली गेली आहे. शाळेसाठी 15 ई-रिक्षा रोज सेवा देत असतात तर फक्त 5 ई-रिक्षा इतरांसाठी उपलब्ध असतात.
74 रिक्षाचालकांवर अन्याय?
अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी, या उद्देशाने हातरिक्षा चालकांनी रिक्षाची मागणी केली होती. परंतु, फक्त 20 हातरिक्षा चालकांना आतापर्यंत परवानगी दिली गेली असून उर्वरित 74 हातरिक्षा चालकांवर अन्याय झाल्याची त्यांची भावना असल्याने त्याचा उद्रेक वारंवार होत आहे. त्यामुळेच पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर या रिक्षांना अजूनही परवानगी दिली न गेल्याने 14 जानेवारीपासून राम चौकात संघटनेचे चालक बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
मुख्याधिकाऱ्यांना पत्र देताना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, संतोष लखन, झऊर चीपडे, शुभम गायकवाड, मनोज रेणोसे, संतोष निचिंदे आदी रिक्षाचालक उपस्थित होते. दरम्यान, उपोषण काळामध्ये ई-रिक्षा सेवा बंद राहणार असून या काळात फक्त आपत्कालीन सेवेसाठी ई-रिक्षा उपलब्ध केल्या जातील, असे संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)