महाड : ऐतिहासिक महाड शहरात आणि तालुक्यात काही वर्षांपासून बेकायदा धंद्यांना ऊत आला आहे. मटका आणि गुटखा हा गल्लोगल्ली दिसत आहे. पोलिसांकडून थातूरमातूर कारवाया करून यातील बड्या व्यावसायिकांना क्लीन चिट दिली जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा बेकायदा धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाडची भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत. ऐतिहासिक चवदारतळे येथे दरवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवान करण्यासाठी येत असतात. अशा ऐतिहासिक शहरात अनेक वर्षांपासून खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. मटक्याबरोबरच गुटखा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे. ठिकठिकाणी बेकायदेशीर गुटखा विक्री होत असून पोलिसांकडून छोट्या छोट्या व्यावसायिकांना लक्ष्य करत थातुरमातुर कारवाई केली जाते.
मटका बंद व्हावा, अशी मागणी होत असली तरी पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर दिसू लागली आहेत. महाड शहरात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तात्पुरती धमक दाखवत हे व्यवसाय काही दिवसांकरिता बंद ठेवले जातात. त्यानंतर काही दिवसात हे व्यवसाय पुन्हा सुरू होतात. या बेकायदा व्यवसायाला राजकीय पाठबळ देखील लाभत असल्याचा आरोप होत आहे. राजकीय नेत्यांनी बंद म्हटले की, हे व्यवसाय बंद आणि सुरू करा म्हटले की सुरू होतात, अशी स्थिती महाडमध्ये आहे. सध्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरू झाली आहेत. याबाबत काही दिवसांपासून महाडकरांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलीस याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपऱ्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटाची भूक भागण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत.
मटका व्यवसाय जसा जोमाने सुरू आहे त्याच पद्धतीत महाड तालुक्यात गुटखा विक्रीदेखील तेजीत आहे. परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची महाड शहरासह तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. यामध्ये देखील बडे लोक असल्याने पोलीस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. टपरीपर्यंत पुरवठा करणाऱ्या लोकांवर थातुर मातुर कारवाई करून पुरवठा करणाऱ्या बड्या धेंडांना एक प्रकारे सूट दिली जात आहे. यामुळे हा व्यवसायदेखील तेजीत असल्याचे ठिकठिकाणी पडलेल्या गुटख्याच्या पाकिटांवरून दिसून येत आहे.
(Edited by Avinash Chandane)