महाड क्रांतीभूमीत मटका,ऑनलाईन लॉटरी तेजीत; पालिका प्रशासनाचे पाठबळ?

ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत गेली कांही दिवसांपासून बेकायदेशीर मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय तेजीत आहे. हे बेकायदेशीर उद्योग थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा डोके वर काढत असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. शहराच्या गल्लोगल्ली हे उद्योग सुरु असले तरी पोलीस आणि पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. तर मटका आणि ऑनलाइन लॉटरी बाबत स्थानिक पदाधिकारी बिपीन महामुणकर यांनी याबाबत तक्रार केली आहे.

निलेश पवार: महाड

ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत गेली कांही दिवसांपासून बेकायदेशीर मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय तेजीत आहे. हे बेकायदेशीर उद्योग थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा डोके वर काढत असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. शहराच्या गल्लोगल्ली हे उद्योग सुरु असले तरी पोलीस आणि पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. तर मटका आणि ऑनलाइन लॉटरी बाबत स्थानिक पदाधिकारी बिपीन महामुणकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार शहरातील ऑनलाइन लॉटरी मध्ये बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून शासनाचा जी.एस.टी. बुडवला असल्याचे निदर्शनास आणून देत मटका आणि अनधिकृत ऑनलाईन लॉटरी तत्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे.
महाड ही जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन भूमी म्हणून तर राजकीय, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या क्रांतीभूमीने दिले आहेत. महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवान करण्यासाठी येत असतात. अशा महाडमध्ये अनधिकृत व्यवसाय डोके वर काढत आहेत. गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीचे दुकाने सुरु होत असताना पोलीस प्रशासन मात्र कानाडोळा करत तेथून निघून जात आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटाची भूक भाग्वण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत.

नियंत्रण आणण्यात चालढकलपणा
बहुतांश मटका व्यवसाय शैक्षणिक संकुलांच्या जवळपास आहेत. छत्रपती शिवाजी चौक परिसरात देखील अनधिकृतपणे झोपड्या उभारून तर पालिकेचे गाळे ज्या कारणासाठी देण्यात आले आहेत त्याचा वापर मटका व्यवसायासाठी केला जात आहे. एकीकडे पोलिसांचे तर दुसरीकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय जोमाने सुरु आहेत. अनधिकृत बांधकामे वाढत असतानाच अनधिकृत व्यवसायावर देखील नियंत्रण आणण्यात पालिका प्रशासन चालढकल करत आहे.

कडक कारवाईची आवश्यकता
महाड मधील छत्रपती शिवाजी चौक परिसरात पालिका गाळ्यांच्या मागील बाजूस हे व्यवसाय खुलेआम सुरु आहेत. या व्यवसायांना कांही बड्या राजकारणी लोकांचा देखील पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्यास हात आखडता घेत आहेत. हातावर पोट असलेले मजूर, कामगार, आदिवासी या मटका आणि ऑनलाईन लॉटरीचे बळी पडत आहेत. दिवसभर कमावलेले पैसे मटक्यावर जात आहेत. यामुळे अनेकजण आपले संसारिक सुख गमावून बसत आहेत. ऐतिहासिक नगरीत हे अनधिकृत व्यवसाय हद्दपार होण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करणे आवश्यक आहे.