पनवेल : श्रीरामाला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. या कालावधीत रामाने रामेश्वरपर्यंत प्रवास केला आणि तेथून श्रीलंकेपर्यंत पूल म्हणजेच रामसेतू बांधला. रामसेतू बांधायलाही श्रीरामाला 14 वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला. मात्र, 14 वर्षांचा वनवास भोगूनही कोकणवासीयांच्या हक्काच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांत शिवडी ते उरण हा समुद्रमार्गावरील अत्यंत अवघड आणि सर्वाधिक लांबींचा पूल बांधण्यात आला, मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधून वाहतुकीलाही मोकळा झाला. हे सुख आणि ‘समृद्धी’ कोकणवासीयांच्या नशीबी केव्हा येणार, असा सवाल या निमित्ताने रायगडसह कोकणवासीय विचारत आहेत.
मुंबई ते गोवा मुळात दुपदरी महामार्ग होता. यूपीए सरकारच्या काळात त्यांचे रुंदीकरण करून तो चौपदरी करण्याचा 2007 मध्ये निर्णय झाला. त्यामुळे 12 तासांचा प्रवास 7 तासांवर येणार होता. प्रत्यक्षात 2010 पर्यंत कामाला सुरुवात झाली नव्हती. 471 किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग करण्यासाठी 2012 मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या महामार्गाच्या कामाचा खर्चही वाढला आहे. सुरुवातीला 7 हजार 500 कोटींचा असलेला खर्च आता 15 हजार कोटींच्या वर गेला आहे. एवढे होऊनही आणखी किमान दोन वर्ष काम पूर्ण होण्याची खात्री नाही. म्हणजे कोकणवासीयांचा खडतर प्रवास यापुढेही सुरूच राहणार आहे.
हेही वाचा… Ladki Bahin : आता लाडकी बहीण योजनेतील इतक्या अर्जांची होणार छाननी ; समोर आली ही माहिती
कर्नाळ्यात काय घडले?
मुंबई ते गोवा महामार्गावरील 471 किलोमीटरच्या मार्गापैकी पनवेल ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा मार्ग बांधण्याची जबाबदारी केंद्राकडे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. तर उर्वरित काम राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते करत आहे. मात्र, याच पनवेल ते इंदापूर महामार्गात अनेक अडचणी आल्या आणि काम रेंगाळले. यातील मुख्य अडथळा होता तो कर्नाळा पक्षी अभयारण्याचा. या भागातून मार्ग काढणे आव्हानात्मक होते. प्रकरण न्यायालयात गेले होते. 6 वर्षे कोर्टकचेरी झाल्यानंतर 2015 मध्ये येथून रस्त्याला परवानगी मिळाली. तोपर्यंत पनवेल ते इंदापूर या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेला कंत्राटदार आर्थिक डबघाईत गेल्यामुळे कामाला ब्रेक लागला. पुढे 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी दुसरा कंत्राटदार नियुक्त केला.
रायगमधील कामांना ब्रेक
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते लोणेरे या टप्प्यातील कामे रखडली आहेत. इंदापूर आणि माणगावच्या बाह्यवळण रस्त्यांचे काम ठप्प आहे. तर कोलाड आणि लोणेरे येथील उड्डाणपुलांची कामे कुर्मगतीने सुरू आहेत. वडखळ ते टेमपाले दरम्यान पाच उड्डाणपुलांची कामे हळूहळू सुरू आहेत. सिंधुदुर्ग ते राजापूर या मार्गाचा अपवाद वगळला तर रत्नागिरीत महामार्गाची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. आरवली ते सावर्डे रस्त्याची अनेक ठिकाणी दुर्दशा झाली आहे. खड्डे, चिखल आणि धुळ यातून वाट काढत कोकणवासीय 14 वर्षे या महामार्गावरून प्रवास करत आहेत.
कामांच्या दर्जावर प्रश्न
महामार्गाचे काम अनेक वर्षे रेंगाळल्याने कामाच्या दर्जावरही फरक पडला आहे. आधी कशेडी बोगद्याला गळती लागली होती. कधी महामार्गावर दरड कोसळते, काँक्रीटच्या रस्त्याला तडे पडतात, काम सुरू असतानाच चिपळूण येथील शेख बहाद्दूर चौकातील उड्डाणपूल कोसळणे, परशुराम घाटातील संरक्षक भिंत खचणे असे प्रकार सुरूच आहेत. यामुळे संपूर्ण महामार्गाचे काम झाले तरी दर्जावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थिती राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंदोलने, कोर्टकचेरी
मुंबई-गोवा महामार्ग काहीही केल्याने होत नसल्याने तसेच कामाला वेग नसल्याने रायगडमधून अनेक आंदोलने, उपोषणे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने नंतर न्यायालयानेही सरकार तसेच महामार्ग बनवणाऱ्या विभागांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.
नवनवीन डेडलाईन
या महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर ते 2016 पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याची नवी डेडलाईन दिली. 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. ही डेडलाईन चुकल्यानंतर 2023 मध्ये काम पूर्ण करण्याची चर्चा होती. अखेर डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली. अखेर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागलीत, असे यंदा सप्टेंबरमध्ये स्पष्ट सांगितले होते. चुकीच्या कंत्राटदारांमुळे हे काम रखडल्याची कबुली त्यांनी दिली होती.
(Edited by Avinash Chandane)