मुंबई -गोवा महामार्ग खड्डेमय आणि दुर्दशाग्रस्त

चुकलेलं नियोजन आणि हुकलेलं प्रशासन यामुळे बदनाम म्हणून देशात उच्चांक गाठलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी माणसाला गेली १३ वर्षे दे माय, धरणी ठाय करून सोडले आहे त्यामुळे प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या कोकणी माणसाकडून देवा कोकणा ऐवजी नागपूरात जन्माला का घातले नाहीस? अशा शब्दात उद्वेगाने भावना व्यक्त केल्या जात आहेत तर या मार्गाची एकूण अवस्था आणि अपघात पाहता या महामार्गाचा प्रवास नको रे बाबा... असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

पोलादपूर: चुकलेलं नियोजन आणि हुकलेलं प्रशासन यामुळे बदनाम म्हणून देशात उच्चांक गाठलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी माणसाला गेली १३ वर्षे दे माय, धरणी ठाय करून सोडले आहे त्यामुळे प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या कोकणी माणसाकडून देवा कोकणा ऐवजी नागपूरात जन्माला का घातले नाहीस? अशा शब्दात उद्वेगाने भावना व्यक्त केल्या जात आहेत तर या मार्गाची एकूण अवस्था आणि अपघात पाहता या महामार्गाचा प्रवास नको रे बाबा… असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा कोकणी माणसाला आभाळ ठेगणं झालं होते. सातत्याने होणार्‍या अपघातांच्या घटनांमुळे कित्येकांना जीव गमवावे लागले होते, अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले होते त्यामुळे स्वाभाविक जनक्षोभाच्या रेट्यामुळे अखेर केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सुखकर जलदगतीने सुरक्षित प्रवासासाठी महामार्गाचे काम २०११ साली सुरु होणे हे त्यामागील कारण होते.
आजच्या धडीला या खचलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी वाहने बंद पडत आहेत. घाटरस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसर्‍या बाजूला दरी असल्याने अपघाताचा धोका असून वाहने दरीत कोसळण्याच्या दहशतीची टांगती तलवार आहे. भोगाव हद्दीत नवीन तयार होणारा महामार्गाचा अपूर्ण काम झालेला तसेच वडखळ ते इंदापूर पहील्या टप्प्यातील रस्ता आणि दुसर्‍या टप्प्यातील इंदापूर ते महाडपर्यंतच्या मुळ अवस्थेतील खराब रस्ता पूर्ण न झालेला माणगाव बायपास रस्ता तसेच कशेडी बंगला ते खेड तालुक्यातील अनुसया हॉटेल (खवटी ) येथपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अतिबिकट आहे. रस्त्याला साईड पट्टी नसल्याने झालेल्या वहिवाटेवर अपघातांच्या वारंवार घटना घड़त आहेत. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे झाले आहे त्या रस्त्यावर जागोजागी तडे गेले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास नको रे बाबा… असे म्हणायची वेळ प्रवाशांवर आली आहे. रस्ता वाहातुकीसाठीअसुरक्षित ठरला असून त्यात सतत निर्माण होणार्‍या वाहतुक कोंडीची भर पडत असल्याने हा महामार्ग जीवघेणा आणि जिकीरीचा बनला असून जिल्हयातील जनतेला तापदायक ठरला आहे.
नुकत्याच पार पडलेत्या विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधीच्या तासात रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेचे फलित म्हणजे डिसेंबर २०२३पर्यत एकेरी वाहतुक सुरू होण्याची ग्वाही सत्ताधार्‍यांकडून देण्यातआली आहे. मात्र अनेक वर्षापासून जाहीर करण्यात येणारी पूर्णतेची मुदत फोल ठरल्याने वाहनचालकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच महामार्गावरून यापूर्वी होणारी वाहतूक तुलनात्मकदृष्ठ्या निम्म्यापेक्षा कमी होत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

रस्ता दरवर्षी खचतोय
कशेडीघाट रस्त्याच्या महामार्गाचा केवळ सहा किलोमीटरचा भाग नवीन चौपदरी महामार्गात समाविष्ट करण्यात आला असून भोगाव गाव हद्दीत रस्ता जुन्या कशेडी धाटात खाली उतरला आहे. हा महामार्ग बोगद्यापर्यंत अर्धवट अवस्थेत असून सद्यःस्थि तीत मूळच्या कशेडी घाटातून वाहतूक सुरू आहे. मात्र भोगाव गावाच्या हद्दीत २००५ साली जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीपासून दरम्यानच्या १७ वर्षांच्या कालावधीत पावसाळ्यात १०० मीटर अंतरातर रस्ता दरवर्षी खचत असतो. त्यावर उन्हाळ्यात राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या महाड कार्यालयाकडून थातूरमातूर आणि तकलादू डागडुजी करण्यात येत असते. मात्र यामुळे दर पावसाळ्यापासून मेपर्यंत रस्ता दोन – तीन फूट खचत असतानाच खड्ड्यात हरवत असतो, अशी रस्त्याची बिकट अवस्था दरवर्षी होत असते.

महामार्गावरील भोगावगाव हद्दीतील खड्डेमय आणि खचणार्‍या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन केले जाईल.
-सुहास मोरे,
तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पोलादपूर