पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाचे काम संपूर्ण राजकीय ताकद वापरून यंदा पूर्ण करणार, अशी ग्वाही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. माणगावमध्ये त्यांनी मंगळवारी (31 डिसेंबर 2024) त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्ग 17 वर्षांपासून रखडला आहे. या मार्गावर शेकडो अपघात झाले असून हजारोंचा जीव गेला आहे. अर्धवट काम, जागोजागी खड्डे यामुळे या मार्गावरून प्रवास अवघड झाला आहे. शिवाय काम रेंगाळल्याने प्रकल्पाचा खर्चही अव्वाच्या सव्वा वाढला आहे. लोकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत तटकरे यांनी माणगाव ते इंदापूर बायपासचे काम 1 फेब्रुवारीपासून सुरू केली जाईल, असे सांगितले.
हेही वाचा… Bharat Gogawale : नवीन वर्षात पालकमंत्रीपदाची भेट मिळणार, भरत गोगावले यांचा पुन्हा दावा
दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांना माणगाव स्टेशनमध्ये थांबा मिळावा आणि दिवा ते वीर मेमू रेल्वेसाठी प्रयत्न करू असेही आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले. कोकणात सागरी मार्ग आणि एक्स्प्रेस महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गाचे पूर्ण करायचे असून त्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व सहकार्याचे आश्वासन दिल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा… Raigad News : 174 आरोपी, 58 लाखांचा मुद्देमाल जप्त, कुणी केली ही कारवाई जाणून घ्या
माणगावची वाहतूक कोडीं सुटणार?
इंदापूर आणि माणगावला नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यासाठी मुंबईहून श्रीवर्धनकडे वाहतूक खरवली जोड रस्ता ते मोर्बा अशी वळवली तर वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच मोर्बा रोड कालवा मार्ग ते मुंबई-गोवा महामार्ग अशी वाहतूक माणगाव शहरात न वळवता सुरू केली जाईल. तसेच भादाव येथे काळ नदीवर पूल बांधला जाईल म्हणजे पुण्याहून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचा मार्ग सोपा होईल आणि माणगावमधील वाहतूक कोंडी फुटेल, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)