मुरुड-मुरुड पर्यटनाचे क्षेत्र आहे.याठिकाणी सुट्टीच्या दिवशी विशेषत: शनिवार आणि रविवारी पर्यटकांची गर्दी असते. मात्र मागील दोन महिन्यांपासून पर्यटकांचा चमू मुरुडकडे फिरकलेच नाहीत. तर दिवाळी सुरू झाली तरी पर्यटका विना समुद्र किनारे सुने पडले आहेत. त्यामुळे पर्यटक गेले कुठे? असा प्रश्न या ठिकाणच्या स्टॉल धारकांना पडला आहे. (Shukshukat on the beach of Murud)
मुरुड शहराला निळसर, स्वच्छ असा तीन किलोमीटर लांबीचा अंथाग असा समुद्र किनारा लाभला आहे.पांढर्या शुभ्र वाळूमुळे दिसणारे स्वच्छ पाणी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असते.या ठिकाणी देश-विदेशातून दरवर्षी दिवाळी निमित्ताने लाखो पर्यटक ये-जा करतात.परंतु यंदा पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. ना वर्दळ, ना गर्दी त्यामुळे संपुर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे.दिवाळीकरिता येणार्या पर्यटकांच्या प्रतीक्षेत स्थानिक आहेत.
मुरुड तालुका हॉटेल व लॉजिंग असोसिएशन अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील या विषयी बोलताना म्हणाले की, मागील चार महिने पावसामुळे व्यवसाय पुर्ण ठप्प होता. त्यानंतर तरी पर्यटकांचा ओघ सुरु होईल,अशी अपेक्षा होती. पावसाळा संपून महिना उलटला तरी पर्यटक आलेच नाहीत.दिवाळीत तरी पर्यटकांची गर्दी सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र दिवाळीच्या सुट्टया सुरु होऊनही पर्यटक आले नाहीत.यामुळे नोकरदारांना पगार कसा द्यायचा? हा पडला आहे.पर्यटकांची संख्या कमी होण्या मागे मुख्य रस्ता हेच कारण आहे. त्याबरोबर जागतिक मंदीचा फटका बसल्याचे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली.