घररायगडफणसाड अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला

फणसाड अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला

Subscribe

नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार विविध प्रकारच्या सुमारे 190 विविध रंगी, बहुढंगी पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत.

नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या कोकण किनारपट्टीवरील मुरुड तालुक्यात असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात आता अन्य प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांचाही किलबिलाट वाढला असून, पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर असणार्‍या या अभयारण्यापासून मुरुड अवघे १० किलोमीटर अंतरावर आहे. 52 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील या अभयारण्यात नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार विविध प्रकारच्या सुमारे 190 विविध रंगी, बहुढंगी पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत. यापूर्वी पक्ष्यांच्या 164 प्रजाती येथे आढळून आल्या होत्या.

नुकतेच महाराष्ट्र वन विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय पक्षी निरीक्षण, गणनेचे आयोजन करण्यात आले होते. यात काही पक्ष्यांची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. लाईन ट्रान्सेक्ट आणि पॉइंट काऊन्ट या शास्त्रीय पद्धतीने ही गणना करण्यात आली. त्यासाठी देशभरातून 130 जणांनी नोंदणी आली, त्यातून 41 जणांची निवड करून त्यांचे 11 गटात विभाजन करण्यात आले होते.

- Advertisement -

या पक्षी गणनेत माशीमार खाटिक, बेडुकमुखी, कोतवाल, कोकीळ, टिकेलचा कस्तुर, विविध प्रजातीची घुबडे, निळ्या ‘चष्म्या’चा मुंगशा, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कालव फोड्या, तीर चिमणी, कस्तुर आदींचा समावेश आहे. याखेरीज 50 प्रजातींची बहुरंगी फुलपाखरे, 18 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 10 प्रजातींचे उभयचर, 4 प्रजातींचे कोळी, 23 प्रकारचे सस्तन प्राणीही आढळूनआले.

प्रत्येक गटासोबत एक पक्षी तज्ज्ञ, एक ग्रीन वर्क्सचा स्वयंसेवक आणि एका वन रक्षकाचा समावेश होता. गणना करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदणीची पडताळणी तज्ज्ञांकडून केल्यानंतरच त्यास संमती देण्यात आल्याचे अभयारण्याचे वन परिक्षेत्राधिकारी राजवर्धन भोसले यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -