तुर्भेत वायू गळती, गटारातून गॅस थेट वस्तीत, नागरिकांना श्वसनाचा त्रास

गॅस परिसरताल्या गटारातून थेट वस्तीत पसरू लागला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागलाय.

Turbhe-Gas-Leakage
हा नाला लोकवस्तीतून जात असल्याने अमोनिया वायू थेट वस्तीत शिरला.

नवी मुंबईतल्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रातील इंदिरानगर परिसरात वायुगळती झाल्याची घटना घडली. इथल्या ज्योती डाई केम प्रा.लि. कंपनीच्या कारखान्यात ही वायुगळती झाली असून इथे राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलाय. हा सगळा एमआयडीसीचा भाग असल्यानेही तेथे हा वायू वेगाने पसरत गेला. काही वेळाने तर गॅस परिसरताल्या गटारातून थेट वस्तीत पसरू लागला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास ही वायू गळती झाली. अचानक परिसरात वायू गळती झालेली लक्षात येताच इथले शिवसेनेचे विभागप्रमुख महेश कोठीवाले यांनी तात्काळ जाऊन कंपनीची पाहणी केली. त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. हा अमोनिया वायू कंपनीच्या गटारामध्ये सोडत असल्याचं दिसून आलं. कंपनीमध्ये अनेक बॅरल उघड्यावर भरून ठेवण्यात आले होते. कंपनी मालकाच्या आदेशाने कंपनीतील गॅस जवळच्या नाल्यात सर्रासपणे सोडला जात होता. कंपनीत साठा केलेला एक ड्रम फुटल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यावर आधी पाणी टाकलं आणि पाण्याच्या प्रवाहाने अमोनिया वायू बाजूच्या अमोल डेअरी येथील नाल्यात सोडण्यात येत होता.

हा नाला लोकवस्तीतून जात असल्याने अमोनिया वायू थेट वस्तीत शिरला. याच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. घसा खवखवणे, धाप लागणे असा त्रास काही नागरिकांना होऊ लागला. तीन नागरिकांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, असे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश कोटिवले यांनी सांगितले.