महाडमधील आयटीआय इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्ष; महापुरानंतर पुरेसा निधीच मिळाला नाही

औद्योगिक शिक्षण देणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) च्या इमारतीची सद्या दुरवस्था झाली आहे. महापुरानंतर इमारतीच्या देखभाल दुरुस्तीला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने आहे त्या परिस्थितीतच मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे.

महाड:  औद्योगिक शिक्षण देणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) च्या इमारतीची सद्या दुरवस्था झाली आहे. महापुरानंतर इमारतीच्या देखभाल दुरुस्तीला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने आहे त्या परिस्थितीतच मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
महाड मध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आयटीआय हे केंद्र सुरु आहे. गेली अनेक वर्षापासून या केंद्रातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून आपला रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. मोटार मेकॅनीक, फिटर, वेल्डर, अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन आदी कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. एका कोर्स करिता साधारण ३० ते ४० विद्यार्थ्याना प्रतिवर्षी प्रवेश दिला जातो. शहर परिसरात आयटीआय प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. अशा काळात पोलादपूर, म्हसळे, रोहा, तळे, माणगाव आदी ठिकाणाहून विद्यार्थी महाडमध्ये प्रवेश घेत होते. आजही येथील आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य असते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाडचा आयटीआय दुर्लक्षित होत चालला आहे. त्यातच सन २०२१ मधील महापुरानंतर आय.टी.आय. ची पुरती वाट लागली आहे. नदीपासून जवळच असलेल्या आय.टी.आय. चे या महापुरात मोठे नुकसान झाले. महाड आय.टी,आय. परिसरात सुमारे दहा फुटापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने विद्युत उपकरणे, लेथ मशीन, विद्युत यंत्रणा, वाहने आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश साधने विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवत दुरुस्त करून घेतली आहेत. हा एक त्यांच्या अभ्यासाचा भाग बनला गेला असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. आयटीआयमधील साधनांबरोबर इमारतीचे देखील नुकसान झाले आहे. मात्र किरकोळ दुरुस्ती वगळता इमारतीचे काम झालेले नाही. इमारतीसमोर असलेली संरक्षक भिंत महापुरात कोसळून गेली आहे. तर आयटीआयच्या आवारात साचलेला चिखल, कचरा आजही तसाच आहे.

अनेक पदे देखील रिक्त
नवीन यंत्रणा उपलब्ध न झाल्याने आहे त्याच यंत्रणेवर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. आयटीआयमध्ये सुमारे सहाशे हून अधिक प्रशिक्षणार्थी प्रतीवर्षी प्रवेश घेत आहेत. मात्र इमारत आणि इतर कामासाठी आवश्यक पुरेसा निधी प्राप्त होत नाही. त्यातच अनेक पदे देखील रिक्तआहेत. यामुळे उपलब्ध कर्मचारी आणि निदेशकांच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. महाड आयटीआय मोटार मेकॅनीक, फिटर, वेल्डर, अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन, या विषयांवर दोन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते.

शासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आयटीआयमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार ५० पदांची आवश्यकता आहे, मात्र फक्त १६ पदेच भरलेली आहेत. जवळपास ३६ पदे रिक्त असल्याने प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. शिल्प निदेशकांच्या १३ जागा रिक्त आहेत तर लिपिकाच्या देखील चार जागा रिक्त आहेत. चतुर्थ कर्मचारी वर्गाची आवश्यकता असताना याठिकाणी फक्त३ पदेच भरलेली आहेत. यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणार्‍यांची संख्या अधिक असली तरी अपुरा निधी आणि अपुरा कर्मचारी वर्ग ही समस्या याठिकाणी निर्माण झाली आहे. शासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे आयटीआय कडे दुर्लक्ष झालेले आहे. पूर्ण कर्मचारी वर्ग इमारत निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत येथील प्राचार्य शिंदे यांनी सांगितले.