अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती कक्ष पडतेय अपुरे

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्‍या गरोदर मातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील प्रसुती कक्ष अपुरे पडत असल्याने गरोदर मातांना प्रसुती कक्षात जमिनीवर उपचार घेण्याची वेळ आली आहे. रुग्णालयातील प्रसुती कक्षात अधिक बेड्सची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातून हजारो रुग्ण हे आपल्या आजारावरील उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात. त्याचप्रमाणे गरोदर माताही प्रसुतीसाठी येत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर प्रसुती आणि नवजात मुलांचे कक्ष आहे. या कक्षात बेडची संख्या ४२ इतकी आहे. त्या तुलनेने दाखल होणार्‍या महिलांची संख्या मोठी असते. प्रसुतीसाठी दररोज २० ते २२ नवीन गरोदर महिला रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे बेडची संख्या कमी आणि गरोदर माता संख्या जास्त होऊ लागली आहे. याचा ताण प्रशासनावर पडत आहे. बेड नसल्याने आणि कक्ष अपुरा पडत असल्याने गरोदर मातांना खाली गादी टाकून तिथे व्यवस्था केली जात आहे.

खासगी दवाखान्यात प्रसुती झाल्यावर अवाच्या सव्वा बील रुग्णाच्या नातेवाईकांकडून आकारले जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो आहे. हा खर्च पेलवत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जाते. रोज वाढत असलेली गरोदर मातांची संख्या पाहता प्रसुती कक्ष हा अपुरा पडत चाललेला आहे. तर दुसरीकडे या कक्षाच्या बाहेरील भिंतीचे काम सुरू असल्याने आतील भागातील रुग्णांना दुसरीकडे हलविले आहे. याचाही परिणाम होऊ लागला आहे. यामुळे प्रसुती कक्षाचे क्षेत्र वाढवून त्यातील बेड संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

रुग्णवाढ झाली हे खरे…
प्रसुती कक्षात गरोदर मातांची संख्या वाढली आहे.रुग्ण संख्या वाढली असली तरी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. लवकरच ही समस्या सोडविली जाईल.
-डॉ. सुहास माने -जिल्हा शल्यचिकित्सक