Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर रायगड पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर गायब !

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर गायब !

उपचारांसाठी रुग्णांची हेळसांड

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक पाचाड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णावर उपचार करण्यासाठी ग्रामस्थांना धावाधाव करावी लागत आहे. या ठिकाणी रात्रीच्या सेवा बजाविण्यास एक डॉक्टर नेमलेले असताना देखील अशी वेळ का येते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रायगड किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या या आरोग्य केंद्राचा पाचाडसह सांदोशी, सावरट, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणीवाडी, आमडोशी, करमर, बावळे, बाऊलवाडी, पुनाडे, घरोशी, छत्री निजामपूर, टकमकवाडी आदी गावांना आधार आहे. याशिवाय पर्यटकांना देखील याच केंद्रातील उपचारांवर अवलंबून राहावे लागते. या गावांना पाचाड वगळता जवळपास २४ किलोमीटर अंतरावर महाडमध्ये उपचार किंवा प्रसुतीसाठी येणे शक्य होत नसल्याने या केंद्रात नेहमीच गर्दी असते.

मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारतीची आणि इतर आरोग्य सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी कायम आवाज उठवला मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना परिचारिकांच्या उपचारावर अवलंबून राहावे लागत आहे. यात अनेकदा रुग्णाला धोकाही संभवण्याची भीती असते. दुर्गम, डोंगराळ भाग असल्याने सर्प आणि विंचू दंश होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली असणे गरजेचे असते. मात्र डॉक्टरच नसल्याने धोका अधिक असल्याचे स्थानिक नागरिक अजय गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, या ठिकाणी असलेली रुग्णवाहिका भंगारमध्ये काढण्याच्या लायकीची असल्यामुळे चालक त्याच्या जबाबदारीवर हे वाहन चालवत आहे. कर्मचारी आणि डॉक्टर यांना राहण्यास असलेल्या कर्मचारी वसाहतीची पुरती दुर्दशा झाली आहे. इमारतीचे छप्पर नुकत्याच आलेल्या वादळात उडून गेले आहेत. यामुळे कर्मचारी आणि डॉक्टर तेथे राहण्यास तयार नाहीत. त्यातच आरोग्य केंद्रात दोन्ही महिला डॉक्टर असल्याने मोडक्या कर्मचारी वसाहतीमध्ये राहणे देखील धोकादायक झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही फरक पडलेला नाही. स्थानिक आमदार भरत गोगावले देखील या प्राथमिक आरोग्य केंद्रासामोरून अनेकवेळा किल्ले रायगड आणि परिसरात गेले असले तरी त्यांनी या केंद्राची दुरवस्था जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही.

गेले अनेक वर्षे ग्रामस्थ आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे परिसरातील रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
– शाश्वत धेंडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचाड

- Advertisement -