HomeरायगडPali Ballaleshwar : पालीच्या बल्‍लाळेश्‍वराचा आता चिक्कीचा प्रसाद, देवस्थान ट्रस्टने का घेतला...

Pali Ballaleshwar : पालीच्या बल्‍लाळेश्‍वराचा आता चिक्कीचा प्रसाद, देवस्थान ट्रस्टने का घेतला हा निर्णय

Subscribe

पनवेल : अष्टविनायक क्षेत्रांपैकी रायगड जिल्ह्यातील पालीचे श्री बल्लाळेश्वर देवस्थान एक आहे. त्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते. या भाविकांना 18 डिसेंबरपासून (संकष्ट चतुर्थी) चिक्कीचा प्रसाद देण्याचा निर्णय श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांनी घेतला आहे. यापूर्वी भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिला जात असे. आता लाडूसोबत प्रसाद म्हणून चिक्कीही ठेवण्यात आली आहे. या चिक्कीची किंमत ३० रुपये आहे. विशेष म्हणजे देवाला अर्पण केलेल्या नारळांपासून चिक्की तयार केली असून ती उपवासालाही चालते. चिक्की देवस्थानाकडून बनवली जात असल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा…  Panvel News : पनवेलच्या न्हावेमध्ये दुबईसारखे मिरॅकल उद्यान, रविवारी रामबाग उद्यानाचा भव्य वर्धापनदिन

- Advertisement -

या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी बुधवारी (१८ डिसेंबर) झाली. त्यानिमित्ताने श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी चिक्कीचा प्रसादाचा शुभारंभ केला. श्री बल्लाळेश्वराला चिक्कीच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्वास गद्रे, अमोल साठे व डॉ. पिनाकीन कुंटे यांच्यासह मुख्य पुजारी गणेश कोणकर, धनंजय गद्रे गुरुजी आदी उपस्थित होते. भाविकांनीही चिक्की प्रसादाचे स्वागत केले आहे.

- Advertisement -

चिक्कीचा प्रसाद का?

देवापुढे ठेवलेल्या नारळांचा पुनर्वापर टाळणे आणि याच नारळापासून चिक्की केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, हा यामागचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. सध्या बुंदीच्या लाडूचा प्रसाद दिला जातो. मात्र, बुंदीचा लाडू जास्त दिवस टिकत नाही. चिक्की जास्त दिवस टिकते. शिवाय चिक्कीच्या निमित्ताने आलेल्या नारळांचा वापर होतो, बॉक्स बनवण्याच्या निमित्ताने पुन्हा रोजगाराची संधी उपलब्ध होते, हेदेखील यामागील कारण असल्याचे गद्रे यांनी सांगितले.

लाडू, चिक्कीच्या प्रसादाला किती मागणी?

श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला रोज सरासरी साडेचार ते पाच हजार भाविक येतात. त्यातील ४०० ते ५०० भाविक लाडूचा प्रसाद घेतात. हिवाळ्याच्या दिवसात लाडू प्रसादाची मागणी हजार बॉक्सवर जाते. एका बॉक्समध्ये दोन लाडू असतात आणि त्यांची किंमत ३० रुपये आहे. आता चिक्कीचा प्रसाद सुरू केला असून चिक्कीच्या बॉक्सचे वजन १२५ ग्रॅम आहे. काल पहिल्याच दिवशी चिक्कीच्या दीडशे बॉक्सची विक्री झाली. भाविकांना जशी माहिती मिळेल तशी चिक्की प्रसादाची मागणी वाढत जाईल, असे गद्रे यांनी सांगितले.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -