पाली-खोपोली मार्ग प्रवासासाठी डोकेदुखीचा

वाकण-पाली-खोपोली मार्ग प्रवासासाठी सध्या डोकेदुखीचा ठरत असल्याने वाहनचालक आणि प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गापासून थेट मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासासाठी हा मार्ग सोयीचा पडत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन या मार्गाचे रूंदीकरण सुरू आहे. मात्र तब्बल ५ वर्षांचा कालावधी उलटला तरी काम पूर्ण होत नाही. याबाबत प्रसारमाध्यमांतून वारंवार टीकेचा भडीमार होऊनही संबंधितांवर त्याचा काडीचाही परिणाम होत नसल्याने स्वाभाविक कामालाही वेग येत नाही. पाऊस सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर स्त्यावर माती टाकण्यात आल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, बाजूपट्टीही भुसभुशीत झाली आहे.

यामुळे पालीहून-खोपोलीकडे निघालेला टँकर रात्रीच्या सुमारास गोंदाव फाटा हद्दीत बाजूपट्टीच्या चिखलात रूतून बसला. तर पोलीस चेक नक्याजवळ मालाने भरलेला डंम्पर खड्ड्यात आदळून रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. विशेष म्हणजे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असली तरी त्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अर्धवट झालेली कामे आणि अवजड वाहने याचा त्रास इतर वाहनांना, तसेच प्रवाशांना होत आहे. सध्या तरी या मार्गाला कुणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे.