पनवेल : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पेण शहरात सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू झाले. मात्र, कंत्राटदाराने काम सुरू केल्यानंतर काम थांबवले आहे. आता दोन महिने झाले तरी पेणमधील सीसीटीव्ही यंत्रणा बसलेली नाही. त्यामुळे हे काम कशामुळे थांबले, सीसीटीव्ही नसल्यामुळे गुन्हेगारीला कसा आळा बसणार, असे प्रश्न पेणकर विचारत आहेत. परिणामी वाढत्या चोऱ्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पेण शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव पेण नगरपरिषदेने मंजूर केला. त्यासाठी निधीची तरतूद केली आणि टेंडर काढून कंत्राटदाराला कामदेखील देण्यात आले. मात्र, सीसीटीव्हीचे काम सुरू झाल्यानंतर काही काळाने ते थांबले आहे. पेण शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने आता सीसीटीव्हीची नितांत गरज आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारांना मागोवा घेणे सोपे जाते. काही तांत्रिक कारणामुळे कंत्राटदाराचे काम संथगतीने सुरू आहे, मात्र, ते वेळेत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आपलं महानगरला दिली.
हेही वाचा… Panvel News : रस्ता रुंदीकरणातील अडथळे जमीनदोस्त, टपाल नाक्यावर फिरला कारवाईचा जेसीबी
पेण हे तालुक्याचे ठिकाण आहे शिवाय रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असल्याने येथे कायम वर्दळ असते. शहरात चोऱ्या आणि इतर गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेची गरज आहे. मात्र, काम सुरू होऊनही पूर्ण होत नसल्याने गाडे कुठे अडकले, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, सीसीटीव्ही बसवण्यासाठी कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदत असून काम वेळेत पूर्ण होईल, असे मुख्याधिकारी म्हणत आहेत.
6 महिन्यांची मुदत
पेण शहरात एकूण 108 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी 1 कोटी 45 लाख रुपये खर्च केले जात आहेत. यासाठी पोलिसांनी सर्वेक्षण करून शहरात 158 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याचे सांगितले होते. ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर दिली असून सहा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.
फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण होईल
ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर दिली असून सहा महिन्यांत पेणमधील सीसीटीव्हीचे काम पूर्ण करायचे आहे. कंत्राटदाराला काही अडचणी आहेत, मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत काम पूर्ण होईल.
– जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण
(Edited by Avinash Chandane)