पाली : नवीन वर्षाच्या स्वागतला अवघे काही तास उरले आहेत. अशातच रायगडमध्ये पोपटी पार्टी रंगू लागल्या आहेत. पोपटीमध्येही वेगवेगळे ट्रेंड सुरू असून शाकाहारी आणि मांसाहारी पोपटीमुळे पर्यटकांची चंगळ झाली आहे. पोपटीत वालाच्या शेंगांबरोबर कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन, मासळी आणि चिंबोऱ्या घालून लज्जत वाढवली जाते. वालाबरोबर मटारच्या शेंगा देखील टाकतात. ठिकठिकाणी शेतावर तसेच मोकळ्या जागेवर, फार्महाऊस आणि घराबाहेर मोकळ्या जागेत आदी ठिकाणी या पोपटी पार्ट्यांची धूम पाहायला मिळते.
विशेष म्हणजे काही हॉटेल व कॉटेज व्यावसायिकांनी त्यांच्या मेनूमध्ये पोपटीचा समावेश केला आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने पर्यटकदेखील पोपटीची मजा लुटतात. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला होतो, अशी माहिती सुधागड तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आश्रय काटकर यांनी दिली.
-
पावटा व पुणेरी वालावर समाधान
जिल्ह्यात चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी वालाच्या शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती असते. मात्र स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झालेल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच खवय्यांना समाधान मानावे लागत आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या पावट्याच्या शेंगासुद्धा पोपटीसाठी वापरतात. गावठी वालांच्या पोपटीतील वालाच्या शेंगा कितीही खाल्या तरी त्या पोटाला बाधत नाही ही त्यांची खासीयत आहे.
-
निडीच्या गावठी शेंगांना पसंती
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा टपोऱ्या दाण्यांसाठी आणि विशिष्ट गोड चवीसाठी प्रसिद्ध आहेत. निडीगावच्या परिसरातील जमिनीचा पोत कसदार असून परंपरागत पद्धतीने जपवूणक करून ठेवलेले बियाणांचाच वापर येथे केला जातो. या वालाची चव, शेंगेचा आणि दाण्याचा आकारही मोठा तसेच शेंग रुचकर असल्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
-
खाडीची पोपटी
उरण तालुक्यातील रहिवासी गणेश कोळी यांनी सांगितले की, खाडीतून पकडलेल्या ताज्या चिंबोऱ्या, फंटूस किंवा इतर कोणतेही मासे व मोठ्या कोलंब्या या पोपटीत टाकल्या जातात. यासाठी स्थानिक मसालासुद्धा वापरला जातो. तसेच वालाच्या शेंगांबरोबरच तूर व मटारच्या शेंगादेखील टाकल्या जातात. ही अनोखी पोपटी ठराविक लोकच चांगल्या प्रकारे बनवतात, त्यासाठी विशेष तयारी देखील करावी लागते. ही विशेष खाडी पोपटी सर्वदूर पसरली असून अनेकजण तिची लज्जत चाखण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत, असे गणेश कोळी यांनी सांगितले.
-
भांबुर्डीच्या पाल्याचे महत्त्व
याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतानाही याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चवदेखील येते.
-
वालाऐवजी पावट्याची पोपटी
शेतात लावलेल्या पावट्याच्या शेंगांची पोपटी बनवली आहे. कारण अजून गावठी वालाच्या शेंगा येण्यास अवकाश आहे. पोपटी पार्टीच्या निमित्ताने घरातील सर्व मंडळी एकत्र येतात. महिला, ज्येष्ठ आणि लहानमुले विशेष आनंद घेतात. पोपटीचा आस्वाद घेता घेता गप्पा गोष्टी रंगतात. या हंगामात दरवर्षी कुटुंबीयांसोबत पोपटीचा बेत केला जातो.
– मयुरी रुपेश ठोंबरे, पाली
-
पोपटीला पसंती
रायगडमध्ये पोपटीचे सर्वांना आकर्षण आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पोपटी उपलब्ध आहे. थर्टीफर्स्टसाठी खास पोपटीचा बेत आखला जात आहे. जिल्ह्या बाहेरून येणारे पर्यटकांना पोपटी खूप आवडते. यामुळे रोजगारालाही चालना मिळते. – उमेश तांबट, पर्यटन व्यावसायिक, सुधागड
(Edited by Avinash Chandane)