पेण : पोपटी पार्टी म्हटली की रायगड जिल्ह्याचे चटकन डोळ्यासमोर येते. पेण, माणगाव, अलिबाग भागातील वालाच्या शेंगांची पोपटी पार्टी म्हणजे रुचकर, लज्जतदार शेंगांचा आनंद. मात्र, यंदा स्थानिक गावठी शेंगा तयार न झाल्याने पुण्याहून आलेल्या वालाच्या शेंगांवर समाधान मानावे लागत आहे.
स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झाल्या नाहीत. त्यातच खराब हवामान आणि मध्येच आलेल्या अवकाळी पावसामुळे वालाच्या शेंगांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शिवाय बदलल्या वातावरणामुळे स्थानिक शेंगांचे पिक परिपूर्ण होण्यासाठी महिन्याचा अवधी लागू शकतो. त्यामुळे सध्या पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगावर पर्यटकांना समाधान मानावे लागत आहे. पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगा 30 ते 50 रुपये किलोने मिळत होत्या. मात्र, आता या शेंगांची मागणी वाढल्याने 90 ते 100 रुपये किलोने विकल्या जात आहेत. तर स्थानिक वालाच्या शेंगा सुरुवातीला 100 ते 120 किलो दराने मिळतात. आणि बाजारात स्थानिक शेंगा मुबलक प्रमाणात झाल्यावर त्यांचा भाव 50 ते 60 रुपये किलो इतका कमी होतो.
अशी बनवतात पोपटी
वालाच्या शेंगा मातीच्या मडक्यात भरुन त्यात कांदा-बटाटा तसेच अंडी-चिकन भरले जाते. मडक्याचे तोंड मामुर्टीच्या पाल्याने बंद करून हे मडके मोकळ्या जागेत पाळापाचोळा, गवत, लाकडे पेटवून अंदाजे अर्धा तास भाजले जाते. त्यानंतर भाजलेल्या शेंगांना येणार खमंग वास आणि त्यांची रुचकर चव यामुळे पोपटीच्या पार्टीची रंगत वाढते.
रायगडच्या मातीत पिकवलेल्या टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती आहे. विदर्भात खान्देशात ज्याप्रमाणे हुर्डा प्रसिद्ध आहे तसाच रायगडमध्ये गावठी वालाच्या शेंगाची पोपटी प्रसिद्ध आहे. शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत काही ठिकाणी काव्यसंमेलन आयोजित करून पोपटी पार्टीचे आयोजन केले जाते.
पुणेरी शेंगांना मागणी
सध्या गावठी वालाच्या न आल्याने लोक पुणेरी वाल नेत आहेत. कुणी पोपटीसाठी तर कुणी उकडून खाण्यासाठी नेत असल्याने पुणेरी शेंगांची मागणी वाढली आहे.
– राजेंद्र पाटील, भाजीविक्रेता
पिक लांबणीवर
सध्याचे हवामान पाहता स्थानिक वालाच्या शेंगांचे पिक एक महिना लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
– प्रवीण पाटील, शेतकरी
(Edited by Avinash Chandane)