Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणनोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भाजपा, महायुतीकडून जिल्ह्यात पोषक वातावरण - प्रभाकर सावंत

नोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भाजपा, महायुतीकडून जिल्ह्यात पोषक वातावरण – प्रभाकर सावंत

Subscribe

आपले तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात शहरात नोकरीसाठी जातात. नोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भाजपा महायुती सरकारने जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात इंडस्ट्री, उद्योग जिल्ह्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे वक्तव्य भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी 'व्हिजन विकासाचे' या कार्यक्रमात केले.

सिंधुदुर्ग : या ठिकाणचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी मोठी शहरे तसेच शेजारील राज्यात स्थलांतरित होत आहे. हे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यात नोकऱ्या देणारे प्रकल्प, कंपन्या सुरू होणे काळाची गरज आहे. परंतु आपल्या जिल्ह्यातील मागणी आणि गरज ओळखून जिल्ह्यातील तरुणांनी कौशल्य आत्मसात केले पाहीजे. भविष्यात यासाठी लागणारी सर्व कौशल्य प्रशिक्षणे भाजपा आणि महायुती यांच्या माध्यमातून जिल्ह्यात उपलब्ध करून दिली जातील. त्यांच्या आवडीनुसार तरुणांनी प्रशिक्षणे घेवून आवडीच्या व्यवसायात व्यावसायिक बनावे, यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा मुख्यालय आयोजित ‘व्हिजन विकासाचे’ उपक्रमात बोलताना सांगितले. (Prabhakar Sawant big speech to stop migration for jobs at the Vision Development Program)

मुख्यालय पत्रकार संघाने सुरू केलेल्या ‘व्हिजन मतदारसंघ विकासाचे’ कार्यक्रमाचा आठवा प्रश्नोत्तरे कार्यक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या समवेत आज, रविवारी (17 नोव्हेंबर) सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती भवन कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी सावंत यांनी मुख्यालय पत्रकार संघाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणात एखाद्या उमेदवाराने विकासाची संकल्पना मांडली तरी त्याला अपेक्षित प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे केवळ विकासावर चर्चा करणारा हा मुख्यालय पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी बोलताना सावंत यांनी जिल्ह्याची लोकसंख्या साडेआठ लाख आहे. आपले तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात शहरात नोकरीसाठी जातात. नोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भाजपा महायुती सरकारने जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात इंडस्ट्री, उद्योग जिल्ह्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी कौशल्य नसलेल्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे प्रत्येकातील कौशल्य विकास होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात उत्पादित पीक, फळ यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे कौशल्य, तसेच सुतार, गवंडी यासारखी नितांत गरज असलेली कौशल्य विकसित झाली पाहिजेत. अन्य शहरात जाऊन प्रचंड मेहनत घेऊन जेवढे 20-25 हजार रुपये तरुण कमवतात. तेवढीच कमाई तरुण मालक म्हणून यात कमवू शकतात. यासाठी जिल्ह्यातील तरुणांतील कौशल्य विकास करण्याचा प्रयत्न भविष्यात आमचा राहणार आहे, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा – Mahim Constituency : अमित ठाकरेंचे डिपॉझिट वाचले तरी…; सदा सरवणकरांची खोचक टीका

- Advertisement -

जिल्ह्यातील आडाळी एम आय डी सी विकसित करण्याचे येथे मोठ मोठे उद्योग आणण्याचे नियोजन सुरू आहे. सी वर्ल्ड प्रकल्प जिल्ह्यात होणार आहे. सिंधूरत्न, पी एम विश्वकर्मा यामुळे स्वयंरोजगार निर्माण करण्यास मोठी मदत होत आहे. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन तसेच कृषी पर्यटन वाढीवर विशेष लक्ष दिला जाणार आहे. जिल्ह्यात आम्हाला पर्यटनाचे सर्किट तयार करायचे आहे. जिल्ह्यात येणारे पर्यटक गोवा राज्यात न जाता सिंधुदुर्गात थांबावेत, असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रमांवर फोकस करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 10 ते 15 हजार लोक बसतील, असा कन्वेंशन हॉल उभा होण्याची गरज आहे. यामुळे मोठे मोठ्या कॉर्पोरेशन बैठका गोवा ऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतील. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने येथे भरविली जातील. यानिमित्ताने जिल्ह्यात येणारे लोक पर्यटनासाठी सिंधुदुर्गात थांबतील, येथील पर्यटनाचा आस्वाद घेतील, असे यावेळी सावंत म्हणाले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयाचा गेलेला दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. सावंतवाडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे ते लवकरच उभे राहणार आहे. महिला रुग्णालय यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे यावेळी सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यात पक्षाच्यावतीने कॉमन सेवा सेंटर उभे करायचे आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय कार्यालयातील कोणतेही काम विनामूल्य होईल. विविध दाखले घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना येथून सुविधा दिली जाईल. चीपी विमानतळ येथे नाईट लँडिंगला परवानगी नाकारली गेली आहे. ती परवानगी मिळाल्यास येथील विमानांची संख्या वाढेल. तसेच येथील प्रवासी संख्या वाढण्यासाठी चीपी येथून बोटिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पर्यटकांना बोटीतून प्रवास घडविण्यास त्यांनाही आनंद मिळेल. तसेच येणारे पर्यटक विमानाने चीपी येथे दाखल होतील, असे सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा – Congress : भाजपाकडून महाराष्ट्राशी भेदभाव; मोदींच्या राजवटीत, फक्त उद्योगपती अदानीच सेफ – प्रियंका गांधी

थिंक टँक आवश्यक

निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केवळ आपल्या पक्षाच्या किंवा राजकीय व्यक्तींचे ऐकून विकासाची संकल्पना तयार करणे चुकीचे आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांना एकत्र करून त्यांची संकल्पना समजून घेतली पाहिजे. त्यांच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास कसा असावा? हे समजून घेतल्यास सर्वमान्य विकास होऊ शकतो. यासाठी जिल्ह्यात थिंक टँक तयार करणे आवश्यक आहे. या थिंक टँकमधील व्यक्तींशी ठराविक महिन्यांनी बैठक घेऊन विकास साधल्यास जिल्हा गतिमान पद्धतीने पुढे जाण्यास मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत

दरम्यान, जिल्ह्यातील खेळाडूंना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा, महायुती कटिबध्द आहे. त्यासाठी जास्तीचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्राधिकरण आणि जे भाग नगरपंचायतमध्ये समाविष्ट होण्यास तयार आहेत. त्यांना घेवून नगरपंचायत केली जाणार आहे, असे यावेळी प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा – Crime News : नऊ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक; पुरावे नष्ट करून बिहारला गेला पळून


Edited By Rohit Patil

नोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भाजपा, महायुतीकडून जिल्ह्यात पोषक वातावरण – प्रभाकर सावंत
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -