अलिबाग : दीड महिना झाला तरी अलिबाग पोलीस अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावत नाहीत. यामुळे हताश झालेल्या बापाने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रशांत वाडे असे या बापाचे नाव असून ते मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी 18 नोव्हेंबर रोजी शाळेत गेली ती परत आलीच नाही. तेव्हापासून वाडे मुलीच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत.
अलिबाग तालुक्यातील साखर आक्षी गावातील प्रशांत वाडे यांच्या 15 वर्षीय मुलीचा शोध लागत नसल्याने ते हताश झाले आहेत. मुलगी भेटेल या आशेने ते महिनाभरापासून पोलीस ठाण्याचा उंबरठा झिजवत आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेत गेली. संध्याकाळ झाली तरी ती घरी न आल्याने वाडे यांनी तिचा शोध घेतला. तेव्हा अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील तरुणाने तिचे अपहरण केल्याची माहिती त्यांना मिळाली. याप्रकरणी त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलीस उपनिरीक्षक सौंदरमल याचा तपास करत आहेत.
प्रत्यक्षात दीड महिना झाला तरी पोलिसांना मुलगी सापडत नसल्याने हा गरीब बाप खचला आहे. तहान-भूक हरपून ते मुलीला शोधत आहे. ज्या मुलाने तिचे अपहरण केले आहे, त्याच्या नातेवाईकांना भेटून त्यांना वारंवार विनंत्या करत आहेत. माझ्या मुलीला एकदा तरी बघू दे अशी विनवणी ते करत आहेत. तरीही पोलिसांना मुलीचा थांगपत्ता लागत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू किंवा वेळ पडल्यास आत्मदहन करू, असा इशारा या हताश झालेल्या बापाने दिला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.
(Edited by Avinash Chandane)