पेण : तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासींना रब्बी हंगामात ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्याने त्यांनी पेणजवळ डेरा टाकायला सुरुवात केली आहे. हजारो आदिवासी बांधव कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी पेण परिसरातील ग्रामीण भागात कुटुंबांसह दाखल झाले आहेत. त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अंतोरे मराठी शाळेत त्यांना प्रवेश दिला आहे.
पेण तालुक्याच्या पांचगणी, उमरमाल, खैसा, तांबडी, डोंगरपट्टी, पाबळ कुरनाड खोरे, चांदेपट्टी, वरवणे डोंगरपट्टी, कासमाल डोंगरपट्टी विभाग, दिवाणमाल, बांगरवाडी, वेताळपट्टी यासह इतर डोंगराळ भागातील आदिवासी पावसाळ्यात भाजीपाल्यासह विविध लागवड करून उपजीविका भागवत असतात. मात्र, हिवाळा आणि उन्हाळ्यात हाताला काम मिळण्यासाठी डोंगर भागातील हजारो आदिवासी कुटुंब शहरालगतच्या ग्रामीण भागात डेरेदाखल येतात. त्यामध्ये म्हाडा कॉलनी, अंतोरा फाटा, बोरगाव रोड, महाडिक वाडी या भागामध्ये छोटीशी झोपडी बांधून तेथे चार-पाच महिन्यांसाठी स्थलांतरित होतात.
हेही वाचा… Raigad News : दोन वर्षांनंतरही रायगड पोलिसांना चोर सापडेना, चौल दत्त मंदिरातील चांदी चोरीचे प्रकरण
ही मंडळी पेण शहरामध्ये सुरू असलेल्या बांधकामांवर मोलमजुरीचे काम करतात तर काही तरुण, ज्येष्ठ ग्रामीण भागातील वाढणाऱ्या मोठमोठ्या झाडांना तोडण्याचे काम करून त्यामधून मिळणाऱ्या मोबदल्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या स्थलांतरीत होण्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना जवळच्या शाळेमध्ये प्रवेश देऊन इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी काम केले पाहिजे, असा आदेश आहे. त्यामुळे आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होते.
हेही वाचा… Raigad News : शिवरायांच्या किल्ल्याची पडझड सुरूच, पुरातत्व खात्याचे अक्ष्यम्य दुर्लक्ष
विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय
डोंगराळ भागातील आदिवासी बांधव पावसाला संपल्यावर आणि थंडी सुरू झाल्यानंतर मुलाबाळांना घेऊन पेणच्या आजूबाजूच्या परिसरात वास्तव्य करतात. दिवाळीच्या सुट्टीनंतर त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता सरकारच्या आदेशानुसार अशा स्थलांतरित मुलांचे सर्व्हेक्षण करून मुख्याध्यापक महेंद्र बैकर, सहाय्यक शिक्षक राजेंद्र पाटील पांचगणी येथील सहा-सात विद्यार्थ्यांना अंतोरे मराठी शाळेत प्रवेश दिला आहे.
(Edited by Avinash Chandane)