अलिबाग : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमार्गे मुरुडला जाणाऱ्या पर्यटकांना मिनिटामिनिटाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नाताळची सुट्टी लागल्याने इयरएण्ड पार्टीसाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. त्यातही अलिबाग ते मुरुड पट्ट्यातील समुद्रकिनाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. अलिबाग ते रेवदंडा मुख्यः रस्तावर वाहतूक वाढल्याने क्षणाक्षणाला वाहतूक कोंडीचा अडथळा त्रास देत आहे. यामुळे मौजमजेसाठी जाणारे पर्यटक मेटाकुटीला आले आहेत.
अलिबाग ते रेवदंडा दुर्तफा बागायतीमधून जाणारा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा आहे. या रस्त्याने रेवदंडा, चौल, नागाव व मुरुड तालुक्यातील पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. येणारे पर्यटक वाहन घेऊन येत असल्याने आणि रस्ता अरुंद असल्याने पर्यटकांना जास्त वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अलिबागहून निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांना कुरुळ येथेच वाहतूक कोंडीचा पहिला सामना करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरूस्तीची कामे काढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. कुरुळला वाहनांची लांबलचक रांग दिसत होती. त्यानंतर आक्षी स्तंभ येथेही अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पुढे नागाव शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मुख्यः रस्त्याला नागाव बीचकडून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होतो.
हेही वाचा… Ladki Bahin : अंगणवाडी सेविकांचे काही चुकले का, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही
नागाव हटाळे बाजारपेठेतील अरुंद रस्त्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास अडचण होते. त्यानंतर श्री शारदा पेट्रोल पंप, वरंडे फाटा, चौल पिरांचे देऊळ, चौल नाका ते थेट रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर सतत वाहतूक कोंडीचा त्रास असतो. पर्यटकांच्या वाढत्या वाहनांचा ताण अलिबाग-रेवदंडा मुख्यः रस्त्याला सहन होत नाही. नाताळची सुट्टी, दुसरा आणि चौथ्या शनिवार-रविवारची सुट्टी यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने अलिबाग ते रेवदंडा पट्टातील सर्वच हॉटेल, रिसार्ट फुल्ल झाले झाल्याचे सांगण्यात येते.
अलिबाग ते रेवदंडा या मुख्यः रस्त्यावर वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी आणि पर्यटन सुखकारक व्हावे यासाठी अलिबाग ते रेवदंडा असा समुद्रकिनाऱ्यांकडून नवा रस्ता बांधण्याची मागणी होत आहे. अलिबाग आणि आक्षी साखर तसेच नागाव ते थेरोंड या खाडीवर पूल बांधल्यास अलिबाग ते रेवदंडा हे अंतर कमी होऊन पर्यटनक्षेत्राचा सकारात्मक विस्तार होऊ शकतो.
(Edited by Avinash Chandane)