HomeरायगडRaigad News : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केवळ 9 कोटींचा, तोही लालफितीत अडकला

Raigad News : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केवळ 9 कोटींचा, तोही लालफितीत अडकला

Subscribe

अलिबाग : जनसामान्यांचे सरकार, शेतकऱ्यांचे सरकार असा दावा करणाऱ्या महायुती सरकारकडे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा फक्त ९ कोटींचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवेळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाईचे प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. विशेष म्हणजे जुलैमधील नुकसानीचीही भरपाई अजून मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवेळी पावसामुळे १३ तालुक्यांतील ६ हजार ७३८ हेक्टरवरील शेतीला मोठा फटका बसला. त्यामध्ये ६ हजार ७३० हेक्टर भातपीक आणि ८.३७ हेक्टरवरील नाचणीचे नुकसान झाले. एकूण २२ हजार २८४ शेतकऱ्यांचे ९ कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, तो लालफितीत अडकल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा…  Raigad Road News : यंत्रणांच्या वादात रस्ता भिकार अन् प्रवाशांचे हाल, अलिबाग वडखळ महामार्गाची जबाबदारी कुणाची

वास्तविक रायगडमध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडला. परंतु, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले. या संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असताना जिल्ह्यात ऑक्टोबरमधील अवेळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली. रायगड जिल्ह्यात १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान, झालेल्या अवेळी पावसामुळे पेण, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, माणगाव, तळा, रोहा, सुधागड पाली, महाड पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या १३ तालुक्यांतील १ हजार २७३ गावांमधील २२ हजार २८६ शेतकर्‍यांच्या भात आणि नागली पिकांचे ६ हजार ७३८ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

या नुकसानीचा अहवाल तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या स्वाक्षरीने तो अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु शेतकर्‍यांना अजून नुकसानभरपाई मिळाली नाही. हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना भरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जुलैमध्ये झालेल्या नुकसानीचीही भरपाई अजून मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सर्वाधिक बाधित गावे माणगावमध्ये

रायगडमधील सर्वाधिक बाधित गावे माणगाव तालुक्यातील आहेत. माणगावमधील तब्बल २०६ बाधित गावे असल्याचे माहिती समोर आली आहे.

(Edited by Avinash Chandane)