अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांचा कारभार प्रशासकाकडून सुरू आहे. आता विधानसभा निवडणुका संपल्याने रायगडमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून चार तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पेण, महाड, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता रायगडमधील प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी, जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शासकीय यंत्रणा प्रभाग रचनेच्या कामाला लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा… Pen Urban Bank : ईडीमुळे पावणेदोन लाख ठेवीदारांना दिलासा, 625 कोटी परत मिळण्याचा मार्ग मोकळा
ग्रामीण भागातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामपंचायतींच्या मतदारयादींचा कार्यक्रम जुलैमध्ये झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये मतदान होण्याची अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. आता विधानसभा निवडणूक झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हालचाल सुरू झाली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक, महाड तालुक्यातील तीन, पनवेलमधील एक आणि खालापूर तालुक्यातील दोन अशा सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामालादेखील लागली आहे.
हेही वाचा… Shambhuraj Desai : राऊतांना आवरा, नाहीतर… शंभूराज देसाईंची जोरदार टीका
या कामाला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यावर सुनावणी झाल्यावर अभिप्राय नोंदवून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे, निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभार रचनेला व्यापक प्रसिद्धी करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 24 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
- पेण – निधवली
- महाड – मुमुर्शी, भोमजई, पिंपळकोंड
- पनवेल – वहाळ
- खालापूर – उंबरे, दुरशेत
(Edited by Avinash Chandane)