HomeरायगडRaigad News : रायगड जिल्ह्यात धनदांडग्याची दादागिरी, कलोतेफाटा नडोदे रस्त्यावर थेट 3...

Raigad News : रायगड जिल्ह्यात धनदांडग्याची दादागिरी, कलोतेफाटा नडोदे रस्त्यावर थेट 3 ते 4 फुटांचे अतिक्रमण

Subscribe

खोपोली : मुंबई-पुणे महामार्गालगत कलोते फाट्यावरून नडोदेसह अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. या रस्त्याला लागूनच कलोते ग्रामपंचायत हद्दीत कलोते फाटा ते नडोदे मार्गावर काहींचे कंपनीसह फार्महाऊस आहेत. मात्र काही फार्महाऊस आणि कंपनीमालकांनी कलोते फाटा ते नडोदे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करत वॉलकंपाऊडचे बेकायदा बांधकाम केल्याने मार्ग अरुंद झाला आहे. दोन्ही बाजूच्या वॉलकंपाऊडमुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या संदर्भात ग्रामपंचायतीने फार्महाऊस कंपनीमालकांशी पत्रव्यवहार करून बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या जागेवर कब्जा करणाऱ्या या धनदांडग्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

हेही वाचा…  Raigad News : उरणमधील मोरा बंदरला चिखलाचा वेढा, मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास धोकादायक

- Advertisement -

कलोते ग्रामपंचायत हद्दीत अनेक कलाकार, सेलिब्रिटी आणि बड्या लोकांच्या जमिनी आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायत हद्द वर्षभर पर्यटनाचे स्थळ बनली आहे. असे असले तरी ही ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तालुक्यात कायम चर्चेत असते. आता तर थेट जिल्हा परिषदेच्या जागेवर काही धनदांडग्यांनी अतिक्रमण करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

कलोते फाटा ते नडोदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक ती जागा फार्महाऊस आणि कंपनी मालकांनी न सोडता वॉलकंपाऊड तसेच तारेचे कंपाऊंड बांधले आहेत. त्यामुळे कलोते फाटा ते नडोदे गावाकडे जाणाऱ्या ग्रामस्थांच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे. वॉलकंपाऊंड केल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येत आहेत. रस्त्याचे नूतनीकरण होऊनही चाळण झाल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद ढिम्म

10 फेब्रुवारी 2021 रोजी बेकायदा बांधकामासंदर्भात जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि नडोदे ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्याची पाहणी करून वॉल कंपाऊंडचे मोजमाप करण्यात आले होते. त्यावेळी वॉल कंपाऊड रस्त्यावर 3 ते 4 फूट आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर येथील बेकायदा बांधकाम हटवले जाईल अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांना होती. प्रत्यक्षात चार वर्षे होत आली तरी काहीही बदल झालेला नाही.

नव्याने नोटीसा पाठवल्या

काही जागा मालकांनी रस्त्यालगत अतिक्रमण करत दगडी वॉल कंपाऊंड बांधले आहेत. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याने जागामालकांना 10 फेब्रुवारी 2021 रोजी नोटीशी काढून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी नोटीसीला उत्तर न देता अतिक्रमण तसेच ठेवल्याने पुन्हा 18 डिसेंबर 2024 रोजी नव्याने नोटीसा काढून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. – नीलेश म्हसकर, ग्रामविकास अधिकारी, कलोते

ग्रामस्थ संतप्त

16 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देत, काही जागामालकांनी रस्त्याला लागून जाणून-बुजून केलेले बांधकाम किंवा सुरू असलेले बांधकाम त्वरीत थांबवावे, अशी विनंती केली होती.
– ईश्वर पवार, ग्रामविकास अधिकारी, नडोदे

ग्रामपंचायतीच्या यांना नोटीसा

  • हानीफ कापडिया
  • वसंत वासुदेव वर्तक
  • शशिकांत ब्राह्मने
  • राणी अरुण महंत
  • अनिल मित्तल
  • राजेंद्र अगरवाल-सुरेंद्र सोमानी
  • रुपेश वेणू
  • रोहित साने
  • भालचंद्र कोळी

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -