पनवेल : महाड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. याच चवदार तळ्याला साक्षी ठेवत क्रांतीभूमी ते शौर्यभूमी अशा धम्म पदयात्रेचा मंगळवारी (17 डिसेंबर) प्रारंभ झाला. या धम्म पदयात्रेत 25 ते 30 भिक्कू आणि आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले आहेत. इतिहास जागृत ठेवण्यासाठी ही धम्म पदयात्रा असल्याचे भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे. क्रांतीभूमी ते शौर्यभूमी अशी धम्म पदयात्रा प्रथमच काढण्यात आली आहे.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा केला जातो. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी, कार्यकर्ते तेथे अभिवादन करण्यासाठी जमा होतात. यावेळी प्रथमच शौर्यभूमीवर महाडवरून निघालेली धम्म पदयात्रा दाखल होणार आहे. पदयात्रेच्या प्रत्येक मुक्कामात अनुयायी वाढत जातील. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी धम्म पदयात्रा भीमा कोरेगावमध्ये दाखल होईल. तेथे मुक्काम केल्यानंतर 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करून पदयात्रेची सांगता होईल. समाज जागृतीचा विस्तव कधीही विझता कामा नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. म्हणूनच डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला साक्षी ठेऊन चवदार तळ्यावरून धम्म पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा… Raigad News : उरणमधील मोरा बंदरला चिखलाचा वेढा, मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास धोकादायक
धम्म पदयात्रेचा प्रवास
- 19 डिसेंबर – खांडपाले, लोणेरे
- 20 डिसेंबर – माणगाव, कोस्ते
- 21 डिसेंबर – बोंडशेत, विळे
- 22 डिसेंबर – ताम्हीणीघाट, आदरवाडी
- 23 डिसेंबर – घाटमंदिर, ताम्हीणी चौक
- 24 डिसेंबर – मुळशी, जामगाव
- 25 डिसेंबर – पौड, पिरंगुट
- 26 डिसेंबर – भूगाव, बावधन
- 27 डिसेंबर – पाषाण, मंगळवार पेठ
- 28 डिसेंबर – माहिपाला रोड, नागपूर चौक
- 29 डिसेंबर – कालवड, लोहगाव
- 30 डिसेंबर – वाघोली, लोणीकंद
- 31 डिसेंबर – कोरेगाव, विजयस्तंभ
- 1 जानेवारी – विजयस्तंभाला अभिवादन
(Edited by Avinash Chandane)