HomeरायगडRaigad News : दासगावचा तलाव कात टाकणार, तलावासह विश्रामगृहाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण...

Raigad News : दासगावचा तलाव कात टाकणार, तलावासह विश्रामगृहाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण सुरू

Subscribe

महाड : तालुक्यातील दासगाव गावातील तलाव लवकरच कात टाकणार आहे. तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून सोबत शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचेही नूतनीकरण सुरू झाले आहे. अनेक वर्षांपासून दासगावमधील तलाव आणि शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. याला आमदार भरत गोगावले यांनी प्रतिसाद दिल्यामुळे हे काम सुरू झाले आहे.

महाड शहराजवळ असलेल्या दासगावमधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. शासकीय विश्रामगृहाशेजारीच तलाव आहे. हा तलाव कधी बांधला याची नोंद नसली तरी दासगावमध्ये शिवकालीन दौलत गड असल्याने या तलावाला तितकेच महत्त्व आहे.

हेही वाचा…  Raigad News : प्रथमच क्रांतीभूमी ते शौर्यभूमी धम्म पदयात्रा, चवदार तळ्याला साक्षी ठेवत प्रारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाडमधील सामाजिक क्रांतीच्या लढ्यासाठी आले असता ते बोटीतून दासगावला उतरले होते आणि याच विश्रामगृहात थांबले होते, अशी नोंद आहे. यामुळे या विश्रामगृहाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण व्हावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. चौथ्यांदा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करून या दोन्ही कामांसाठी भरीव निधीची तरतूद करून घेतली आहे.

हेही वाचा…  Raigad News : उरणमधील मोरा बंदरला चिखलाचा वेढा, मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास धोकादायक

दोन एकर परिसर असलेल्या या तलावाचा विकास व्हावा यासाठी सातत्याने ग्रामस्थांकडून मागणी केली जात होती. काही वर्षांपूर्वी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या तलावाला भेट देऊन निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले होते.

असे होणार सुशोभीकरण

या तलावातील गाळ काढून तलावाच्या चहुबाजूने गॅबियन पद्धतीची भिंत उभी केली जाणार आहे. तलावाच्या चहुबाजूने पथमार्ग आणि त्यावर पथदिवे, बसण्यासाठी आसनांची व्यवस्था, छोटेसे गार्डन विकसित केले जाईल. तलावाच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले आहेत. शिवाय दीड वर्षात काम पूर्ण करायचे आहे. शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीसाठी देखील 5 कोटी 55 लाखांची तरतूद केल्याचे सांगण्यात येते. शासकीय विश्रामगृहाची तीन मजली इमारत असून यामध्ये छोटे रूम, कॉन्फरन्स हॉल, किचन अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामामुळे दासगाव परिसरातील रहिवाशांचा ओघ वाढून तलाव परिसराला पर्यटनाचे स्वरुप मिळून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)