उरण : भाऊचा धक्का (मुंबई) ते मोरा (उरण) या जलप्रवासात प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देखील कोणतेही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांकडून संतापाची लाट पसरली आहे. जलवाहतुकीत समुद्रातील चिखल, गाळ ही मुख्य समस्या बनली आहे. चिखल व गाळामुळे अनेक जहाजे, बोटी चिखलात रुतत आहेत. तर चिखल व गाळ जास्त असल्यामुळे जहाज, होड्या मंद गतीने पुढे जात असल्यामुळे जलप्रवास सर्व प्रवांशासाठी आता डोकेदुखी बनली आहे. यावर त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे.
भरती-ओहोटीच्या वेळी उरण ते मुंबई व मुंबई ते उरण जलप्रवास करताना प्रवाशांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मोरा बंदरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेच्या बोटी 4 ते 5 तास बंद असतात. त्यामुळे खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱायंना वेळेवर कामावर पोहचता येत नाही. महिन्यातून 3 ते 4 वेळा लेटमार्क लागतात. तसेच 1 ते 2 नाहक खाडे होतात. अमावस्या आणि पोर्णिमेला असे महिन्यातून दोनदा बोटींचे वेळापत्रक बदलते. भाऊच्या धक्यावरून सुटलेल्या बोटी काहीवेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात. त्यामुळे वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दिक वाद होतात. वेळापत्रक चुकल्याने बस, ट्रेन मिळत नाही. जास्त खर्च करून खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
हेही वाचा… Raigad News : रांजणखार ग्रामस्थांसमोर प्रशासन नमले, विश्वासात न घेता केलेली शासकीय मोजणी थांबवली
अशा अनियमित वेळापत्रकामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आजारी व्यक्ती, उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना, वयोवृद्धांना, लहान मुलांना तसेच महत्त्वाच्या कामाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना त्रास होतो, असे दत्ता पुरो या प्रवाशाची तक्रार आहे.
प्रवास सुरक्षित करा
मोरा बंदराजवळचा चिखल, गाळ नियमितपणे अत्याधुनिक पद्धतीने काढण्यात यावा तसेच बंदराची लांबी वाढवावी. तसे केल्यास प्रवाशांचा काहीसा कमी होईल. – दत्ता पुरो, प्रवासी
(Edited by Avinash Chandane)