अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानकडून नेहमीच विविध समाजोपयोगी आणि कल्याणकारी उपक्रम राबवले जातात. स्वच्छता अभियान हा त्यातीलच एक भाग आहे. रविवारी (22 डिसेंबर) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शेकडो श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन रेवदंडा ते अलिबाग या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता केली. प्रवाशांना आणि पर्यटकांना आता या रस्त्याचा परिसर स्वच्छ दिसू लागल्याने त्यांनीही आनंद व्यक्त करून या उपक्रमाबद्दल आभार मानले आहेत.
अलिबाग ते रेवदंडा हा 68 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा खूप कचरा पडला होता, सर्वत्र घाण झाली होती. त्यामुळे याचा प्रवाशांना तसेच पर्यटकांनाही त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करण्याची मोहीम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने जाहीर केली. त्यानंतर तब्बल 1 हजार 224 श्री सदस्यांनी रविवारी सकाळपासून या स्वच्छता अभियानात सहभागी होत रस्ता चकाचक केला. या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता करत चक्क ४४ टन कचरा गोळा केला. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
हेही वाचा… Raigad Politics : होय मी इच्छुक, गोगावलेंची प्रतिक्रिया, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी कुणाचे पारडे जड
रायगड जिल्ह्यातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियानासोबतच रक्तदान शिबीर, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता मोहीम राबवली जाते. याशिवाय वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या स्वच्छता अभियानाची दखल घेत राज्य सरकारने त्यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
(Edited by Avinash Chandane)