मुरुड : उन्मत्त झालेल्या सिद्दीला नामोहरम करण्यासाठी 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि जिगरबाज मावळ्यांनी मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटरवर अरबी समुद्रात पद्मदुर्ग किल्ला बांधला. केवळ मुरुडचाच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पराक्रमाची शान असणाऱ्या पद्मदुर्ग किल्लाची अनेक वर्षांपासून समुद्राच्या लाटेमुळे दुरवस्था होऊन पडझड सुरू झाली आहे. ही पडझड थांबता थांबत नाही. तरीही पुरातत्व खाते केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
हेही वाचा… Raigad News : दोन वर्षांनंतरही रायगड पोलिसांना चोर सापडेना, चौल दत्त मंदिरातील चांदी चोरीचे प्रकरण
पद्मदुर्ग किल्ला शिवछत्रपतींनी बांधल्यामुळे या किल्ल्याला स्वराज्यात वेगळेच स्थान होते. मात्र, आता किल्ल्याची पडझड सुरू असून ही बाब कुणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यात आणि केंद्रात स्थापन झालेले सरकार कायम शिवरायांचे नाव घेत आहे. मात्र, पद्मदुर्ग किल्ला त्यांच्या नजरेतूनही दुर्लक्षित राहिला आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पद्मदुर्ग किल्ल्याच्या पडझडीकडे लक्ष देऊन केंद्र सरकार आणि केंद्रातील पुरातत्व विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावी आणि किल्ला संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा जेणेकरून किल्ला पुन्हा भरभक्कमपणे उभा राहील. तसेच किल्ल्यात शिवछत्रपतींचा सुंदर पुतळा उभारुन शिवछत्रपतींना मानवंदना द्यावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.
हेही वाचा… Raigad News : पालीतील भरमसाठ मालमत्ता कराविरोधात आगरी समाज आक्रमक, 15 दिवसांत तोडगा न काढल्यास …
या संदर्भात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले पद्मदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोणतीही निधी प्राप्त झालेला नाही. मात्र, किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 लाखांचा इस्टेमेट तयार करुन ठेवला आहे. यामध्ये मुख्य दोन दरवाजे, पायऱ्या आणि मधला रॅब बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण किल्ल्याचे संवर्धन करावयाचे असेल तर किमान 10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे बजरंग येलीकर यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)