अलिबाग : दोन दिवसांपासून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांना विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. बुधवारी विधानसभेसाठी मतदान झाले त्यानंतर रस्ते, नाके, कट्टे, समाजमाध्यम, बस, हॉटेल, कार्यालय आदी सगळीकडे निकाल आणि एक्झिट पोलबाबत चर्चा सुरू आहे. मतदानानंतर काही कार्यकर्त्यांनी थोडा आराम केला तरी काहींना त्यांच्या दैनंदिन कामात लक्ष घातले. मात्र, बहुतांश कार्यकर्ते मतांची आकडेमोड करण्यात व्यग्र आहेत. तर काहींनी निकालानंतर कसा जल्लोश करायचा याची तयारीही सुरू केली आहे.
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी 69.15 टक्के मतदान झाले. कुणी प्रथमच निवडणूक लढवत आहे, कुणाची दुसरी किंवा तिसरी निवडणूक आहे. तर कुणी विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा बसल्यानंतर विजयाचा गुलाल उधळण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीची मदार कार्यकर्त्यांवर असते, त्यामुळेच प्रत्येक नेता कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करतो, त्यांच्यावर चांगलाच खर्च केला जातो. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांशिवाय उमेदवारांचे पानही हलत नाही.
हेही वाचा… Vote Counting : रायगडकरांनो, तुमच्या मतदारसंघातील मतमोजणी या केंद्रांवर होणार, जाणून घ्या ती केंद्रे
हॉटेल, ढाबेवाल्यांची कमाई
मतदानानंतर बहुतांश कार्यकर्त्यांनी रात्री हॉटेल तसेच ढाब्यांवर गर्दी केल्यामुळे रायगडमधील महामार्गांवरील हॉटेल-ढाबे रात्री फुल्ल होते. शिवाय, गाव-खेड्यातील छोटी-मोठी हॉटेल्सदेखील कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरली होती. यामुळे हॉटेल तसेच ढाबेवाल्यांची चांगलीच कमाई झाली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून उमेदवारांनी आणि पदाधिकार्यांनी प्रचाराचे नियोजन केले होते. प्रचार फेर्या, बैठका, पत्रके वाटणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे, छुपा प्रचार करणे या कामांत कार्यकर्ते व्यग्र होते. त्यामुळे मतदान संपल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
(Edited by Avinash Chandane)