HomeरायगडRaigad News : बंदरांसह थर्टीफर्स्टवाल्यांवर नजर, जिल्ह्यातील 11 ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही

Raigad News : बंदरांसह थर्टीफर्स्टवाल्यांवर नजर, जिल्ह्यातील 11 ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही

Subscribe

अलिबाग : विस्तीर्ण समुद्रकिनारा, पर्यटनाचे आकर्षण आणि जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक प्रकल्प लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने रायगड पोलिसांनी जिल्ह्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर आणखी करडी केली आहे. बंदरे, समुद्रकिनारे, महत्त्वाची ठिकाणे यावर लक्ष ठेवतानाच थर्टीफर्स्टवाल्यांवरही हे सीसीटीव्ही कॅमेर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे दहशतवादी कारवाईसोबतच झिंगणाऱ्यांनाही ब्रेक लावण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहे.

रायगडमधील मुरुड, मांडवा सागरी, अलिबाग, श्रीवर्धन, वडखळ, श्रीवर्धन, दिघी सागरी, रोहा, पोयनाड आणि रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लँडिंग पॉईंट तसेच बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अलिबागसह वरसोली समुद्रकिनारा, रेवस पकटी, मांडवा बंदर, रेवस बंदर, आगरदांडा प्रवासी वाहतूक जंगल जेट्टी, धरमतर जेट्टी, राजपुरी, धरमतर पोर्ट, दिघी प्रवासी जेट्टी, बागमांडला जेट्टी, दिघी पोर्ट, पीएनपी जेट्टी, जेएसडब्ल्यू जेट्टी, सानेगाव जेट्टी, या अकरा ठिकाणी तब्बल दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे घातक प्रवृत्तीसोबतच पर्यटकांच्या हाचलालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी रायगड पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली आहे. असे असले तरी आजही जिल्ह्यातील काही बंदरांवरून डिझेलची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Nitesh Rane Controversy : राहुल – प्रियंका गांधी यांना निवडणुकीत मदत करणारे…राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. या उद्योगांना लागणार माल आणि कारखान्यांतून तयार होणाऱ्या मालाची ने-आण बंदरातून केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात जलवाहतूक आणि रस्ते वाहतूक खूप महत्त्वाची आहे. मुंबईतून हजारोंच्या संख्येने गेट-वे, भाऊचा धक्का येथून पर्टयक अलिबागला येतात. येथून पुढे, काशीद, मुरुड, नागाव, रेवदंडा, किहीम आदी समुद्रकिनारी भटकंतीला जातात. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सागरी सुरक्षेवर पोलिसांनी भर दिला आहे. आताही 2024 या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले आहेत. या सर्वांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

- Advertisement -

चोख बंदोबस्त अन् बंद कॅमेरे

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी पोर्ट व अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसोली समुद्रकिनारी प्रत्येकी एक कॅमेरा बंद असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे विचारणा केली असता, त्यांनाही याविषयी माहिती नसल्याचे समजले.

बंद कॅमेर सुरू केले जातील

जेट्टी आणि पोर्ट येथील बंद कॅमेरे तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. सागरी सुरक्षा आणि पर्यटकांची सुरक्षा यावर आमचा भर आहे. – हनुमंत शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -