HomeरायगडRaigad News : मुरुड बाजारपेठेतील दोन दुकाने आगीत खाक, नक्की काय घडलं

Raigad News : मुरुड बाजारपेठेतील दोन दुकाने आगीत खाक, नक्की काय घडलं

Subscribe

मुरुड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानाला आग लागल्यामुळे गुरुवारी सकाळी शहरात खळबळ उडाली. ही आग एवढी भीषण होती की अग्निशमनाचे 6 बंब, 6 टँकर तसेच पाच हजार लीटरचे 10 ड्रम पाणी आग विझवण्यात खर्ची पडले. त्यानंतरही आग आटोक्यात न आल्याने अखेर रोह्यातील अनिकेत तटकरे मित्रमंडळाचे तज्ज्ञ सागर दहिमबेकरआणि सहकारी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच मुरुड कोस्ट गार्डचे टँकर मागवण्यात आले. तब्बल 7 तासांनी आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या आगीत कपड्याचे दुकान आणि सराफा दुकान खाक होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

मुरुड मुख्य बाजारपेठेत उमेश गोबरे यांच्या मालकीची एक मजली इमारती आहे. खालच्या गाळ्यात विजय जैन यांचे कपड्यांचे दुकान आहे. दुसरा गाळ्यात अशोक जैन यांचे नाकोडो ज्वेलर्सचे दुकान आणि वरच्या मजल्यावर उमेश गोबरे राहतात. नेहमीप्रमाणे अशोक जैन देवळातून परतत असताना कपड्याच्या दुकानातून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच विजय जैन यांना कळवले.

हेही वाचा…  Panvel News : पनवेलच्या न्हावेमध्ये दुबईसारखे मिरॅकल उद्यान, रविवारी रामबाग उद्यानाचा भव्य वर्धापनदिन

विजय जैन तातडीने दुकानात आले आणि दुकान उघडताच इन्व्हर्टरजवळ आग पेटल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु, तोपर्यंत आग वाढली होती. कपड्यांनी पेट घेतला होता. तोपर्यंत मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळवल्यामुळे ते घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग विझवण्याऐवजी भडकत होती. यावेळी मदत करणारे सनी जैन यांच्या डोक्यावर कौले पडल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजुबाजूच्या विहिरींमधून पाणी काढून विझवण्याचे काम स्थानिक करत होते. काही जवानांनी आणि रहिवाशांनी शिडी लाऊन घरातील सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग कशी लागली यांचा तपास मुरुड पोलीस करत आहेत. दरम्यान, आगीची माहिती कळताच मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक विनित चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, उमेश गोबरे हे बुधवारी नातेवाईकांच्या लग्नाला सहकुटुंब मुंबईला गेल्याने त्यांच्या घरातील कोणतीही मौल्यवान वस्तू वाचली नाही.

एक गाडी अपुरी

मुरुड बाजारपेठेतील रस्ते अरुंद असल्यामुळे आणि मुरुड जंजिरा नगरपरिषदेकडे अग्निशमन दलाची एकच गाडी असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते. त्यामुळे नगरपरिषदेकडे आणखी एक अग्निशमन दलाची गाडी असावी, अशी अपेक्षा मुरुडकरांनी व्यक्त केली आहे.

(Edited by Avinash Chandane)