महाड : रायगड जिल्ह्यातील दोन स्थळांची इंग्रजी स्पेलिंग सारखीच असल्यामुळे लांबच्या जिल्ह्यांतून आलेल्या पर्यटकांची गल्लत होते. यातील एक आहे अष्टविनायकांमधील खालापूर तालुक्यातील महड (Mahad) आणि दुसरे आहे ऐतिहासिक शहर महाड (Mahad).विशेष म्हणजे या दोन्ही स्थळांची इंग्रजी स्पेलिंग सारखीच असल्यामुळे गुगल मॅप पाहून येणाऱ्या पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो आणि याचा मोठा भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो.
महडमधील वरदविनायकाच्या दर्शनासाठी राज्यातून भाविकांचा ओघ सुरू असतो. महड आणि महाड हे रायगडमधील दोन टोके आहेत. सारख्या स्पेलिंगमुळे महडला जाणारे भाविक महाडला पोहोचतात तर ऐतिहासिक महाड भूमी पाहायला येणारे पर्यटक महडच्या मंदिरात दाखल होतात. इंग्रजीमध्ये किंवा युनिकोडमध्ये टायपिंग करताना महड आणि महाड यांची इंग्रजी स्पेलिंग Mahad अशीच आहे. अष्टविनायकांपैकी महड वरदविनायक आणि पालीमधील बल्लाळेश्वर असे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहेत. या दोन्ही देवस्थानांमधील अंतर जेमतेम तासाभराचे आहे.
पाली पाहून झाल्यानंतर अनेक जण गुगल मॅप किंवा गुगलवरील माहितीचा आधार घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. पालीपासून महाड जवळपास 80 किलोमीटरवर आहे. या प्रवासाला साधारण दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे भाविक वरदविनायकाच्या दर्शनाला जाताना महडऐवजी थेट महाडला येऊन थांबतात.
महाड शहरात प्रवेश केल्यानंतर गणेश मंदिर कुठे आहे, असा प्रश्न पर्यटक महाडकरांना रोज विचारताना दिसतात. अशा वेळी जागरुक महाडकर त्याला तुम्ही चुकून महाडला आला आहात याची जाणीव करून देतो. ज्यांना अष्टविनायक करायचे आहे ते महाडवरून पुन्हा महडकडे रवाना होतात. मात्र जे केवळ पर्यटनासाठी आलेले असतात ते महाड, चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि परिसरातील रायगड किल्ला, गांधारपाले लेणी पाहून पुढे तळ कोकणाकडे मोर्चा वळवतात.
वेबसाईटवर चुकीचा उल्लेख
अनेक वेबसाईटवर ‘महड’चा उल्लेख ‘महाड’ असाच आहे. शिवाय गुगल मॅपवरही इंग्रजीमध्ये स्पेलिंग MAHAD अशी टाकली जात असल्याने नकाशाप्रमाणे वाहनचालक थेट महाडला येतात. यामुळे अनेक पर्यटक, भाविकांचा वेळ, पैसा आणि इंधन वाया जाते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही दिवसांपूर्वी शैक्षणिक सहलीमधील एक सहलीची गाडीदेखील महडऐवजी महाडला आली. गुगलमधील स्पेलिंगच्या सारखेपणामुळे भाविकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
(Edited by Avinash Chandane)