HomeरायगडRaigad News : 174 आरोपी, 58 लाखांचा मुद्देमाल जप्त, कुणी केली ही...

Raigad News : 174 आरोपी, 58 लाखांचा मुद्देमाल जप्त, कुणी केली ही कारवाई जाणून घ्या

Subscribe

अलिबाग : राज्य उत्पादन शुल्कच्या रायगड विभागाने डिसेंबरमध्ये विशेष मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल 58 लाख 55 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 174 आरोपींना अटक केली आहे. बेकायदेशीररित्या दारुविक्री, निर्मिती व वाहतूक करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

डिसेंबरमध्ये पर्यटनासाठी रायगडमधील समुद्रकिनारे, किल्ले, हिल स्टेशन तसेच रिसॉर्ट आणि फॉर्महाऊसमध्ये पर्यटकांची गर्दी होते. अशा वेळी गावठी दारुसह बेकायदेशीररित्या अन्य देशी, विदेशी दारुची विक्री वाहतूक आणि निर्मिती करणार्‍यांना रोख लावण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. काहीजण इतर राज्यांतून नियमबाह्य दारू आणून ती विकण्याचा प्रकार करतात. तर काही जण बनावट दारु तयार करून बाजारात विकण्याचे धाडस करतात. त्यामुळे डिसेंबरमध्ये विशेष मोहीम राबवून याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला.

हेही वाचा…  Raigad Tourist : काशीद समुद्रकिनारी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

रायगड विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गोवा तसेच इतर राज्यांतून येणार्‍या वाहनांची तपासणी केली. तसेच छुप्या पद्धतीने कंपनीचे लेबल लावून बनावट दारू तयार करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठिकाणी गस्त घातली होती. या महिनाभरात केलेल्या कारवाईत एकूण 224 गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय 174 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 7 वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांसह एकूण 58 लाख 55 हजारांचा जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या रायगड विभागाने दिली.

(Edited by Avinash Chandane)