माणगाव : व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वीर यशवंतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी माणगावचे प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप, प्रमुख अतिथी म्हणून कर्नल किशोरकुमार मोरे होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, घाडगे उत्सव समितीचे सचिव तथा तहसिलदार दशरथ काळे, वीर यशवंतराव यांचे वारसदार सुभाष घाडगे, माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेख तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष सहादेव खैरे,माजी अध्यक्ष विष्णू सावंत, पोलादपूर माजी सैनिक संघटना अध्यक्ष वाय.सी.जाधव, माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती सभापती सुविधा खैरे आदींसह आजी-माजी सैनिक,पोलीस अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्याने इटलीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. हिटलरच्या नाझी सैन्यापासून इटलीला मुक्त करण्याच्या लढाईत सुमारे 50 हजारांहून अधिक भारतीय सैनिकांनी भाग घेतला होता. भारतीय सैन्यदलाच्या 5 व्या मराठा लाईट इन्फट्रीच्या नाईक यशवंत घाडगे यांनी 10 जुलै 1944 रोजी झालेल्या तुंबळ लढाईत अत्यंत अतुलनीय पराक्रम दाखवला होता. येथील अप्पर टायबर व्हॅलीच्या पर्वत रांगांमधील लढाईत आपले सहकारी धारातीर्थी पडत असताना, त्यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. या निकराच्या लढाईत विजय मिळाला तरी रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील पळसगाव आंब्रे वाडीतील यशवंत घाडगे यांना अवघ्या 22 व्या वर्षी वीरमरण आले होते.
वीर यशवंतराव घाडगे यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना बिटिशांचा व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. भारतीय सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत इटलीमधील कम्युन ऑफ मोनोटोन आणि इटालियन लष्करी इतिहासकारांनी, इटलीतील पेरुगियामधील मॉन्टोन येथे गेल्या वर्षी व्ही. सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियलचे अनावरण केले.
(Edited by Avinash Chandane)