पनवेल : आतापर्यंत काही बड्या नेत्यांच्या मतदारसंघात ‘भावी मुख्यमंत्री’ असे होर्डिंग्ज किंवा बॅनर लावून कार्यकर्ते, पदाधिकारी योग्य तो संदेश देत होते. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे. मतमोजणी होण्यापूर्वीच आणि निकाल लागण्याआधीच उमेदवार विजयी झाल्याचे होर्डिंग्ज अनेक मतदारसंघात झळकू लागले आहेत. रायगडमध्ये असे बॅनर महाड-पोलादपूर मतदारसंघात भरत गोगावले, अलिबाग मतदारसंघात महेंद्र घरत आणि श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे तसेच अनिल नगवणे यांचे लागले आहेत.
रायगडमधील सात मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहेच. शिवाय पेण, उरण आणि पनवेल मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये सामना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार दिल्याने या तीन मतदारसंघात तिरंगी लढत आहे.
हेही वाचा… Jitendra Awhad : नारायण राणेंनी शरद पवारांविषयी केलेल्या विधानावर आव्हाडांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या स्नेहल जगताप यांच्यात थेट लढत आहे. मात्र, निकालापूर्वीच गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे होर्डिंग्ज लावून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे गोगावले यांच्या कार्यकर्त्यांच्या अतिविश्वासाचे दर्शन घडले आहे. अलिबागमध्येही शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाल्याचे झळकले आहेत.
श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महायुती) अदिती तटकरे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अनिल नवगणे उभे आहेत. तर काँग्रेसचे राजेद्र ऊर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात महाविकास आघाडीतील फूट उघड झाली आहे. अशातच अदिती तटकरे यांच्या विजयाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या शिवाय अनिल नवगणे यांचेही शेतकरी पुत्र आमदार होणार असल्याचे होर्डिंग्ज लागल्याने यातून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या होर्डिंग्जवर भरघोस मतांनी, विक्रमी मतांची विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे नमूद केले आहे.
(Edited by Avinash Chandane)