खोपोली : खालापूर तालुक्यामधील खिरकंडी गावातील पारले कंपनीत व्यवस्थापनाकडून बेंबदशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप कामगारांकडून होत आहे. कामगारांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाल्याने एकवटलेल्या कामगारांनी कामगार नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सदस्यत्व घेतले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (9 जानेवारी) भाई जगताप यांची कंपनीसमोर गेट मिटींग झाली. यावेळी भाई जगताप यांनी कंपनी व्यवस्थापनाला सज्जड दम भरत इशारा दिला आहे.
सुरळीत चालणारी कंपनी अचानक कशी बंद पडण्याच्या मार्गावर आली, असा सवाल करत पारलेतील कामगार रोजीरोटीसाठी रस्त्यावर आले आहेत, ते गुन्हेगार नाहीत, असे भाई जगताप यांनी ठणकावून सांगितले. एवढेच नाही तर जमिनीला सोन्याचा भाव आला आहे म्हणून जमीन विकून गुजरातला जाणार असाल तर शेवटपर्यंत लढण्याची ताकद आमच्यात आहे, असेही भाई जगताप यांनी पारले व्यवस्थापनाला सुनावले. अन्यायाविरोधात लढण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून दिला आहे म्हणून कोणाच्या बापाला घाबरायचे नाही असे सांगत आमची युनियन कामगारांचा करार करणारी आहे, कामगारांच्या हितासाठी दोन पावले मागे येणारी आहे, असे भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा… Raigad News : रोहेकरांच्या संतापाचा उद्रेक, म्हणाले नराधमाला खुलेआम फाशी द्या!
काय आहे प्रकरण?
खिरकंडी गावात 17 वर्षांपासून पारले कंपनी सुरू आहे. बाजारात पारलेच्या बिस्किटला जोरदार मागणी असताना कंपनीने अचानक डबघाईला आल्याचे आवई उठवली आणि दिवाळीच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या कालावधीतच 14 कामगारांची दुसऱ्या राज्यात बदली केली. या 14 पैकी 12 स्थानिक आहेत. यातील कुणीही बाहेर जायला तयार नव्हते. दोन कामगार भूज आणि निंबराणाला बदली घेऊन गेले. तेव्हापासून कंपनीत कामगारांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप संघटनेच्या कोअर कमिटीच्या सदस्य करत आहेत.
पारले कंपनी व्यवस्थानावर आरोप
कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना जाणूनबुजून त्रास देणे, धमक्या देणे असे प्रकार कंपनीत सुरू असल्याचा आरोप कामगार करत आहेत. त्यामुळे 327 कायमस्वरुपी कामगारांनी युनियन स्थापन करण्याचे ठरवले आणि त्यांनी भाई जगताप यांची भेट घेतली. साधारण तीन आठवड्यांपूर्वी कंपनीत भारतीय कामगार कर्मचारी महासंघ पारले विभाग अशी संघटना स्थापन झाली असून त्याचे 200 कामगार सदस्य झाले आहेत.
पारले कंपनी गेट मिटींगसाठी संघटनेचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, उपाध्यक्ष सदानंद चव्हाण, रविंद्र नेमाडे, एस.आर.सावंत आदी उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)