अलिबाग : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडमधील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली आहेत. हॉटेल, रिसॉर्ट तसेच इतरत्र व्यावसायिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात व्यग्र आहेत. जिल्ह्यातील हॉटेलमध्ये 80 टक्के बुकिंग झाल्याने आता ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल, लॉजिंगसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने आणि मांसाहारात मासळीला मागणी असल्याने त्यासाठीही जादा दर मोजावे लागत आहेत. पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दिली असली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे रेंगाळलेले काम, वाहतूक कोंडी यामुळे पर्यटक जेरीस आले आहेत. तर पर्यटकांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
चौथा शनिवार-रविवार सुट्टीचा असल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून पर्यटकांनी रायगडकडे मोर्चा वळवला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनपूरक व्यवसायांनी विविध उपक्रम राबवले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पर्यटकांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हॉटेल, कॉटेज, लॉजमध्ये अॅडव्हॉन्स बुकिंग केले आहे. दोन दिवसांत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मच्छी महागली
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने आणि त्यांची माशांची मागणी असल्यामुळे मासळीचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत मासळीचे दर 50 ते 60 टक्के वाढले आहेत. मात्र, पर्यटक मौजमजेसाठी आल्यामुळे महागाईचा फारसा विचार करत नाहीत.
पर्यटकांची पसंती
समुद्रकिनारे : अलिबाग, किहीम, वर्सोली, मांडवा, काशीद, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन
धार्मिक स्थळे : बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महड), हरिहरेश्वर, साळाव बिर्ला मंदिर
गड किल्ले : रायगड, जंजिरा, कुलाबा, कोर्लई
थंड हवेचे ठिकाण : माथेरान
महामार्गामुळे मनस्ताप
रायगडमधील पर्यटन स्थळी जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा सोपा पर्याय आहे. मात्र, महामार्गाच्या चौपरीकरणाचा खेळखंडोबा झाल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, रोहा तालुक्यांतील पर्यटन स्थळांवर पोहोचण्यासाठी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय धुळीचे साम्राज्य, खड्डे यांना तोंड देत प्रवास करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांचे दोन-अडीच तास वाया जातात.
सुरक्षेला प्राधान्य
पर्यटकांची गर्दी वाढल्याने अतिउत्साहात कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी रायगड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. शिवाय सर्व समुद्रकिनारे, मार्केट परिसरात अधिक बंदोबस्त असेल. महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी दामिनी पथक तसेच साध्या गणेशातील पोलीस ठिकठिकाणी ड्युटीवर असतील. यामध्ये होमगार्डचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील राखीव पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
(Edited by Avinash Chandane)