HomeरायगडRaigad Politics : पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये बॅनरबाजी, एक फिक्स पालकमंत्री, दुसरा भावी पालकमंत्री

Raigad Politics : पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये बॅनरबाजी, एक फिक्स पालकमंत्री, दुसरा भावी पालकमंत्री

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच रायगडमध्ये भरत गोगावले यांचे ‘फिक्स पालकमंत्री’ असे होर्डिंग्ज लागले आहेत. त्याचवेळी श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे यांचे ‘भावी पालकमंत्री’ असे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी गोगावले विरुद्ध तटकरे असा सामना रंगू लागला आहे हे निश्चित! मंत्रीपदाची शपथ आणि खातेवाटप झाल्यानंतर भरत गोगावले रविवारी मतदारसंघात दाखल झाले. मुंबईपासूनच त्यांचे स्वागत सुरू झाले. त्यानंतर कळंबोलीपासून पोलादपूरपर्यंत त्यांची रॅली निघाली होती. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते.

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ भरत गोगावले यांचा ‘फिक्स पालकमंत्री’ असा बॅनर झळकला आणि या बॅनरची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. मंत्री झाल्यापासून आपण पालकमंत्री होणार, असा दावा शिवसेनेचे भरत गोगावले करत आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यात शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी तीन आमदार असून ते आपल्या पाठिशी असल्याचे सांगत गोगावले यांनी पालकमंत्रीपदावर भरभक्कम दावा केला आहे. अशातच ‘फिक्स पालकमंत्री’ असे बॅनर लागल्याने गोगावले यांची पालकमंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत तटकरे समर्थकांनी अदिती तटकरे यांचे ‘भावी पालकमंत्री’ असे बॅनर लावून गोगावले यांना उत्तर दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Crime : निझामपूरमध्ये लज्जास्पद घटना, वृद्धेवरील अत्याचाराविरोधात मोर्चा, युवकाला फाशी देण्याची मागणी

- Advertisement -

रायगडचे पालकमंत्री होणे ही भरत गोगावले यांची पाच वर्षांपासूनची इच्छा होती. यावेळी त्यांना रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचे मंत्रीपद मिळाले असले तरी रायगडमध्येच श्रीवर्धनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते मिळाले आहे. त्यामुळे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी जबरदस्त स्पर्धा आहे. असे असले तरी पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवे, असा दावा गोगावले करत आहेत.

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर गोगावले यांचा सामना थेट सुनील तटकरे यांच्याशी आहे. रायगडचे पालकमंत्रीपद हा भरत गोगावले यांच्यासाठी जसा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तसा सुनील तटकरे यांच्यासाठीही इभ्रतीचा प्रश्न आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची संपूर्ण रायगड जिल्ह्याला उत्कंठा आहे. 2022 मध्ये पालकमंत्रीपदाच्या वादावरून अखेर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद गेले होते. दोघांच्या भांडणात याची पुनरावृत्ती होऊ नये, एवढीच रायगडवासीयांची अपेक्षा आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -