पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढतीची शक्यता आहे. सलग तिसऱ्यांना नेतृत्व करणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड यांच्यात ही लढत अपेक्षित आहे. वास्तविक पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा मतदारसंघ होता. मात्र, रामशेठ ठाकूर यांनी शेकाप सोडून राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पनवेलमधील चित्र कायमचेच बदलले. रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2004 पर्यंत ज्या पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेकापचा आमदार निवडून यायचा तेथून प्रथमच 2009 मध्ये काँग्रेसचे प्रशांत ठाकूर निवडून आले. 1972 पासून शेकापचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसने कायम दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. हे चित्र 2009 मध्ये पहिल्यांदा बदलले होते.
हेही वाचा… Shrikant Shinde : नुसते आरोप नकोत, समोर बसा आणि चर्चा करा; श्रीकांत शिंदेंचे विरोधकांना आव्हान
प्रशांत ठाकूर 2014 आणि 2019 मध्ये भाजपमधून निवडून आले. सलग तीनवेळा आमदार झाल्यानंतर आता आमदारकीचा विजयी चौकार मारण्यासाठी प्रशांत ठाकूर सज्ज झाले आहेत. आता, पनवेलमध्ये महाविकास आघाडीत फूट पडल्याने शेकापचे बाळाराम पाटील आणि शिवसेना उबाठाच्या लीना गरड यांच्यातील मतविभाजनाचा फायदा महायुतीचे प्रशांत ठाकूर यांना होऊ शकतो. पनवेल मतदारसंघात शहरी मतदार जास्त आहेत. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर येथील शहरी मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार, यावर प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील आणि लीना गरड यांचे भवितव्य अवलंबून आहे. हे शहरी मतदार पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहेत. याशिवाय तळोजा परिसरातील गावे, पनवेल तालुक्यातील गावांची संख्याही मोठी आहे. मात्र, पूर्वी जो शेकापचा गड होता त्याचे आता बुरुजात रुपांतर झाले आहे. शहरी मतदार बऱ्यापैकी भाजपकडे झुकले आहे, ही बाब भाजपविरोधकांना दुर्लक्षित करता येणार नाही.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेकापचे हरेश केणी यांनी निवडणूक लढवली होती. ठाकूर यांना 1 लाख 68 हजार 581 मते मिळाली होती तर केणी यांना दुसऱ्या क्रमांकाची 86 हजार 211 मते मिळाली होती. यावरून शेकापचा बऱ्यापैकी प्रभाव या मतदारसंघावर दिसून आला होता. त्यामुळेच ही निवडणूक पनवेलमध्ये शेकापच्या अस्तित्वाची आणि ठाकूर यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधून आमदारकीची हॅट्रिक केली असून त्यांना इथल्या जनतेचे, स्थानिकांचे प्रश्न चांगलेच ठावूक आहेत. त्यांचा जनसंपर्क अफाट आहे. लोकांच्या मदतीला धावून जाण्याची रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांची वृत्ती आहे. शेकापमधून काँग्रेसमध्ये जाताना आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना बहुतांश नेते आणि कार्यकर्ते सोबत आले आहेत. त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत करिश्मा मोठा आहे. शिवाय नैना संदर्भात त्यांनी स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांसोबतच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे ही बाब त्यांच्या जमेची ठरली आहे. शेकापचे बाळाराम पाटील देखील स्थानिक उमेदवार असून त्यांनाही मातीतल्या प्रश्नांची जाण आहे. शिक्षक आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे. लीना गरड या खारघरमधून असल्या तरी त्या मतदारसंघात सर्वश्रुत नाहीत. मात्र, ठाकरे हा ब्रँड त्यांच्यासाठी मोठा लाभदायक आहे. त्यामुळेच या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार
2019 – 5 लाख 57 हजार 513
2024 – 6 लाख 52 हजार 62
(Edited by Avinash Chandane)